सिंधुदुर्गनगरी,ता.०७: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा २०२५ साठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक जिल्ह्यांतील उमेदवारांना अर्ज भरण्यास आलेल्या अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी दिलेल्या माहितीनुसार परीक्षा २३ नोव्हेंबर २०२५ ला होणार आहे. उमेदवारांना आता ९ ऑक्टोबर रात्री ११.५९ पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे.तांत्रिक अडचणींमुळे शुल्क न भरलेल्या उमेदवारांना नेट बँकिंग, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्डद्वारे ९ ऑक्टोबरला रात्री ११.५९ पर्यंत शुल्क भरण्याची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत अंतिम तारीख वाढवून दिली जाणार नाही, याची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे प्रसिद्धी पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.



