एक्साईजची इन्सुली येथे कारवाई; राजस्थान व यूपी मधील दोघे ताब्यात…
बांदा,ता.०७: बेकायदा गोवा बनावटी दारू वाहतूक केल्याप्रकरणी इन्सुली तपासणी नाका येथे दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून १ कोटी ८ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कार्यवाही काल रात्री १ वाचनाच्या सुमारास राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने केली आहे. याप्रकरणी वाहन चालक रामनिवास (वय २५, रा. बाड़मेर, राजस्थान) आणि नूर आलम (वय २६, रा. प्रतापगढ, उत्तरप्रदेश) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, या कारवाईत मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला कंटेनरही जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, काल मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास तपासणी नाका इन्सुली कार्यालयासमोर पथकाने सापळा रचला. गोवा राज्यातून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या टाटा मोटर्स कंपनीच्या बाराचाकी कंटेनरची तपासणी करण्यात आली असता कंटेनरमध्ये गोवा बनावटीचे रॉयल ब्ल्यु माल्ट व्हिस्की या विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला. १८० मि.ली. मापाच्या प्रत्येकी ४८ सीलबंद प्लॅस्टिकच्या बाटल्या भरलेले असे एकूण १५०० कागदी पुठ्ठ्याचे बॉक्स एकूण ७२,००० बाटल्या जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या मुद्देमालात अंदाजे ९३ लाख ६० हजार किंमतीचा अवैध मद्यसाठा, मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले अंदाजे १५ लाख किंमतीचे कंटेनर आणि दोन अँड्रॉइड मोबाईल अंदाजे २० हजार असा एकूण अंदाजे १ कोटी ८ लाख ८० हजार रूपयाचा मुद्देमाल आहे.
या प्रकरणी संशयितांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक धंनजय साळुंखे हे करीत आहेत. ही यशस्वी कारवाई राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त पी. पी. सुर्वे, विभागीय आयुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक श्रीमती. किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत दुय्यम निरीक्षक विवेक कदम, वाहन चालक रणजीत शिंदे, जवान दिपक वायदंडे, सतिश चौगुले, अभिषेक खत्री आणि सागर सुर्यवंशी यांचा सहभाग आहे.



