सिंधुदुर्गनगरी, ता.०७: भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड आणि घृणास्पद हल्ल्याचा सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला. न्यायव्यवस्थेच्या स्वातंत्र्यावर आणि लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांवर झालेला हा आघात असल्याचे मत यावेळी संघटनेकडून व्यक्त केले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड.परिमल नाईक यांच्यासह महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. संग्राम देसाई, उपाध्यक्ष ॲड. विवेक मांडकुलकर, महिला उपाध्यक्ष ॲड. नीलिमा गावडे, सचिव ॲड. यतिश खानोलकर तसेच जिल्हा सरकारी वकील ॲड. संदीप राणे आणि अन्य बहुसंख्य वकील बंधू-भगिनी उपस्थित होते.
गवई हे भारतीय न्यायव्यवस्थेच्या परंपरेचे प्रतीक आहेत. अशा उच्चपदस्थ न्यायाधीशावर करण्यात आलेला हल्ला केवळ वैयक्तिक सुरक्षिततेवरच नाही तर न्यायव्यवस्थेच्या निर्भयपणाला बाधा आणणारा आहे. न्यायव्यवस्था हा लोकशाहीचा आधारस्तंभ असल्याने, तिच्यावरील कोणताही हल्ला सहन केला जाणार नाही, असा एकमुखाने निषेध सर्व उपस्थित वकील सदस्यांनी केला.



