सिंधुदुर्गातील आंबा-काजू उत्पादकांना दिलासा; नितेश राणेंचा विमा कंपनीला दणका…
सिंधुदुर्गनगरी, ता.०७: जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना फळ पीक विमा योजनेचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वी वितरित केला जाणार आहे. भारतीय कृषी विमा कंपनीने याबाबत आश्वासन दिले आहे. शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या समस्या आणि नुकसानभरपाई मिळण्यास होत असलेला विलंब लक्षात घेऊन मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने आज मंत्रालयात एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला कृषीमंत्री दत्तात्रय भरणे आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीत पालकमंत्री श्री. राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या तक्रारी कृषीमंत्र्यांसमोर सविस्तर मांडल्या. भारतीय कृषी विमा कंपनीच्या चालढकल कारभारामुळे शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.संतप्त झालेल्या मंत्री राणे यांनी कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली. राणे यांच्या भूमिकेनंतर विमा कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपली चूक मान्य केली. त्यांनी दिवाळीपूर्वी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना पीक विम्याचा पहिला हप्ता वितरित करण्याचे लेखी आश्वासन दिले. यावेळी पालकमंत्री राणे यांनी कंपनीला स्पष्ट शब्दांत तंबी दिली की, ही शेवटची संधी असून, पुन्हा हलगर्जीपणा झाल्यास गय केली जाणार नाही.
या बैठकीस अपर मुख्य सचिव विकास रस्तोगी, कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी प्रक्रिया व नियोजन संचालक विनयकुमार औटी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सौ. भाग्यश्री नाईक-नवरे आदी उपस्थित होते.



