सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना उपलब्ध होणार आता नैसर्गिक गॅस 

2

एमएनजीएल : योजनेचा वेंगुर्ले शहरात ६ महिन्यात प्रारंभ

वेंगुर्ले : ता.२ 
देशातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून तसेच ग्रामीण भागातील सर्वात स्वच्छ जिल्हा म्हणून सन्मान मिळालेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ‘सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन’ योजनेत केंद्राच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने समावेश केला आहे. या योजनेचा शुभारंभ वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीत येत्या ६ महिन्यात केला जाणार असून येत्या ८ वर्षात संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा हा नैसर्गिक गॅस ने जोडला जाणार असल्याची माहिती एमएनजीएल चे अधिकारी महेश तुपारे आणि सुदर्शन शिंदे यांनी दिली.
देशात या योजनेच्या पायाभरणी कार्यक्रमाचा शुभारंभ २२ नोव्हेंबर २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे झाला. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू नियामक मंडळाने प्राधिकृत केलेल्या देशातील १२९ जिल्ह्यांत नैसर्गिक वायू पुरवठा योजना राबवण्यात येणार आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश असून महाराष्ट्र नैसर्गिक वायू कंपनी (MNGL) मार्फत गॅस पाईपलाईन जोडणीचे काम केले जाणार आहे. कोळसा व इतर द्रव्य इंधनाच्या तुलनेत नैसर्गिक वायू हा सुरक्षित व स्वस्त तसेच पर्यावरण पूरक असे उत्तम इंधन आहे. नळयोजनेद्वारे ज्याप्रमाणे पाण्याचा पुरवठा केला जातो, त्याचप्रमाणे नैसर्गिक वायू (गॅस) पाईपलाईनद्वारे पुरविण्यात येणार आहे. त्यामुळे स्वयंपाक घरात गॅस सिलिंडर साठविण्याची गरज भासणार नाही. जागाही वाचते व सिलिंडर संपल्यावर तो परत उपलब्ध करण्याचा व्यापही कमी होणार आहे. पेट्रोलच्या तुलनेत ६०% आणि डिझेलच्या तुलनेत ४५% स्वस्त आहे. तर एल.पि.जी.च्या किमतीपेक्षा सुमारे ४०% स्वस्त आहे. जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातून गॅस पाईपलाईनला सुरुवात होणार आहे आणि महामार्ग, राज्यमार्ग व त्यानंतर ग्रामीण मार्गाच्या बाजूने गावागावात गॅस पाईपलाईन टाकली जाणार आहे. गॅस पाईपलाईन टाकताना लोकांच्या शेतातून जाणार नाही याची काळजी घेतली जाणार असून, रस्त्याच्या कडेनेच लोकांच्या मागणीनुसार पाईपलाईनने गॅस पुरवठा केला जाणार आहे. पुढील आठ वर्षात संपूर्ण जिल्हा नैसर्गिक गॅस पाईपलाईनने जोडण्यात येणार आहे. या योजनेत घरगुती गॅस वापराबरोबरच हॉटेल व्यावसायिक, छोटे उद्योग व वाहनांसाठीही गॅसचा पुरवठा केला जाणार आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीत या योजनेचा शुभारंभ करण्यात येणार असून त्यासाठी कंपनीकडून घरगुती कनेक्शन साठी नोंदणी घेण्यास सुरुवात केलेली आहे. नागरिकांना  नोंदणी करावयाची असल्यास त्यांनी प्रवीण कांदळकर ९४०३३६९४९९ किंवा सचिन नाईक ९४२३२१६१३५ यांच्याशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी ७५८८०९०५०५ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन तुपारे व शिंदे यांनी केले आहे.

11

4