सोसायटीच्या नोटिसा; आठ दिवसात कर्ज भरण्याची ताकीद…
वेंगुर्ले/शुभम धुरी ता.०४: अवकाळी पावसामुळे झालेले नुकसान ताजे असतानाच वेंगुर्ला तालुक्यातील असोली गावच्या सोसायटीने गावातील २६ लाभार्थी शेतकऱ्यांना चक्क आठ दिवसात कर्ज भरा,अन्यथा कारवाई करू अशा नोटिसा बजावल्या आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.एकीकडे शेतकरी जगला पाहिजे,म्हणून त्याला उभा करण्यासाठी प्रयत्न करू,असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दोन दिवसांपूर्वी जाहीर केले होते.तसेच कर्जमाफी किंवा अवकाळी पावसामुळे झालेल्या या नुकसानीची भरपाई व अनुदान देण्यासाठी प्रयत्न करू,असे म्हटले होते.त्यामुळे सोसायट्यांकडून बजावण्यात आलेल्या या नोटिसा म्हणजे शेतकऱ्यांच्या ओल्या जखमेवर मीठ चोळण्या सारखेचं आहे,असे तीव्र मत शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
एकीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शेतकऱ्यांकडून कर्ज काढल्यानंतर फसवण्यात येत नाही.थकीत कर्जाचे प्रमाण सुद्धा अत्यंत कमी आहे.वसुली जास्तीत.जास्त होते.असे असताना सोसायटी कडून घेण्यात आलेला हा निर्णय वेदनादायी आहे.अशी नाराजी शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.त्यामुळे या नोटीसा आता वादात सापडण्याची शक्यता आहे.