वेंगुर्ले पालिकेच्या हॉलच्या रचनेत बदल करण्यास हिरवा कंदील…?

96
2
Google search engine
Google search engine
Google search engine

पालिका सभेत ठराव;शेवटच्या टप्प्यात बदल सुचविल्याने खडाजंगी…

वेंगुर्ले : ता.४
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या कॅम्प येथील मल्टिपर्पज हॉल शेडच्या रचनेत आता शेवटच्या टप्यात बदल सुचविल्याचे समोर येताच आजच्या सभेत खडाजंगी झाली. अखेर संबंधित विभागाची तांत्रिक मंजूरी घेऊनच सदर बदल करण्याची मान्यता देण्याचे आज झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत ठरविण्यात आले.
वेंगुर्ला नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या अध्यक्षतेखाली न.प. च्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडली. यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, मुख्याधिकारी वैभव साबळे, नगरसेवक सुहास गवंडळकर, तुषार सापळे, साक्षी पेडणेकर, श्रेया मयेकर, प्रशांत आपटे, राजेश कांबळी, सुमन निकम, शितल आंगचेकर, प्रकाश डिचोलकर, कृपा गिरप-मोंडकर, पूनम जाधव, कृतिका कुबल, दादा सोकटे, संदेश निकम यांच्यासह कार्यालयीन अधिक्षक संगिता कुबल व कर्मचारी उपस्थित होते.
वेंगुर्ला नगरपरिषद मल्टिपर्पज हॉल शेडमधील रचनेत बदल करण्यास नगरपरिषदेची मान्यता मिळावी अशी मागणी संबंधित ठेकेदाराने केली होती. या विषयावर सभागृहात चर्चा होऊन सदर हॉलच्या मूळ आराखड्यात बदल केल्यानंतर भविष्यात कोणताही धोका निर्माण झाल्यास त्याची जबाबदारी कोणाची असणार? असा प्रश्न निर्माण झाला. यावेळी नगरपरिषदेस जबाबदार धरण्याची शक्यता असल्याने या कामाच्या ठेकेदाराने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या देखरेखेखाली चालू असलेल्या या इमारतीच्या बांधकामात मोठे बदल असल्यास या विभागाची तांत्रिक परवानगी घेऊनच सदर बदल करावेत असे यावेळी ठरविण्यात आले. या चर्चेत तुषार सापळे, सुमन निकम, संदेश निकम यांनी भाग घेतला. महाराष्ट्र जैविक विविधता अधिसूचना २००८ नुसार जैविक विविधता व्यवस्थापन समिती स्थापन करणेबाबत निर्णय घेण्यात आला. या समितीमध्ये फळ संशोधन केंद्रातील डॉक्टर, कृषी, फॉरेस्ट, कॉलेज मधील प्राध्यापक तसेच जैवविविधतेतील जाणकार नागरीक यांचा समावेश करण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. तसेच नियमानुसार लोक जैवविविधता नोंदवही तयार करणे आवश्यक आहे. यासाठी शासनाकडून ४० हजार एवढे अनुदान प्राप्त झाले आहे. मात्र, प्राप्त अनुदानापेक्षा जास्त खर्च होण्याची शक्यता असल्याने तो खर्च नगरपरिषद निधीमधून करण्यास सभागृहाने मंजूरी दिली. वेंगुर्ला नगरपरिषदेला उपलब्ध शासकीय योजनेतून किवा अनुदानातून रुग्णवाहिक खरेदीसाठी निधी प्राप्त होणार असल्याने सदरची रुग्णवाहिका घेण्याचे ठरविण्यात आले. नगरपरिषद हद्दीतील काही कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आलेली आहेत. सदरची कामे हस्तांतरीत करुन घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्राप्त झालेल्या पत्राचे वाचन करण्यात आले. यावेळी नगरसेवक डिचोलकर यांनी सदरची कामे काही ठिकाणी अपूर्ण असून ती पूर्ण करुन मगच हस्तांतरण करुन घ्यावे असे सुचविले.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत बक्षिस स्वरुपात मिळालेल्या सव्वासहा कोटी निधीचा विनियोग शहराच्या स्वच्छतेसंदर्भातील विविध उपाययोजना, स्पर्धा व स्वच्छता विषयक विकास कामे यासाठी करण्याचे ठरविण्यात आले. यामध्ये वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे स्वच्छता मॅरेथॉन, जलतरण स्पर्धा याबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी कायमस्वरुपी कार्यशाळा, अभ्यासवर्ग घेण्याचे ठरविण्यात आले. वेंगुर्ला शहरातील रस्त्यांचे सुरक्षिततेच्यादृष्टीने रस्ता सुरक्षा लेखापरीक्षण व उपाययोजना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार करणे आवश्यक आहे. यासाठी आवश्यक यंत्रणा नियुक्त करुन हे लेखापरीक्षण व उपाययोजना करणे गरजेचे आहे. वेंगुर्ला शहरात सुमारे ७५ किलोमिटर लांबिचे रस्ते असून या रस्त्यांचे लेखापरीक्षण व उपाययोजना करणेकामी येणारा खर्च हा संबंधित एजन्सीकडून प्राप्त झाला असून सदरचा खर्च हा फार मोठा असल्याने सद्यस्थितीत टप्प्याटप्प्याने शहरातील रस्त्यांचे सुरक्षा लेखापरीक्षण करण्याचे ठरविण्यात आले. कार्यालयीन जनरेटर थ्रीफेज कनेक्शनमध्ये रुपांतर करणे, वेंगुर्ला नगरपरिषदेचे स्वतःचे बोधचिन्ह असणारे ध्वज बनविणे व त्याचा नगरपरिषद प्रशासकीय वाहनांवर वापर करणे, नविन मार्केटचे बांधकाम सुरु असल्याने सांस्कृतिक भवन इमारतीमधील व्यावसायीकांना स्थलांतरीत करणे, प्रायोगिक तत्वावर मलनिःसारण व्यवस्था उभारणे, शहरातील घनकचरा व्यवस्थापन पहाण्यासाठी लोकप्रतिनिधी व कर्मचारी यांचा अभ्यासदौरा आयोजित करणे आदी विषयांवर चर्चा होऊन मंजूरी देण्यात आली.

\