भालावल येथील घटना; वाटेत मोबाईल सापडल्यामुळे गुढ कायम…
बांदा ता,०७:
भालावल-धनगरवाडी येथील समीर धुळू कोकरे (वय २१) या युवकाचा मृतदेह आज सकाळी तेथून लगतच असलेल्या मातीनाला बंधाऱ्यात आढळून आला. बांदा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर हा बुधवारी दुपारी अन्य तीन मित्रांसमवेत मातीनाला बंधाऱ्यात आंघोळीसाठी गेला होता. काल सायंकाळी समीरचे नातलग बकर्यांना रानातून घरी आणत असताना त्याचा मोबाईल वाटेत मिळाला होता. समीर आंघोळीहून घरी आला नसल्याने सायंकाळी उशिरा शोधाशोध सुरू केली. रात्री उशिरा बंधाऱ्या नजीक समीरचे कपडे व चप्पल आढळून आले. गुरूवारी सकाळी वाडीतील ग्रामस्थांनी पुन्हा शोध मोहीम राबविली. त्यावेळी बंधाऱ्यात समीरचा मृतदेह आढळून आला.
बंधाऱ्यात सुमारे १० फूट खोल पाणीसाठा आहे. त्याला पोहता येत नसल्याने तो मागाहून पाण्यात आंघोळीसाठी एकटाच उतरला होता का असा प्रश्न नातेवाइकांकडून उपस्थित केला जात आहे. बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी सहकार्यांसह घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आला आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. समीरच्या पश्चात आई-वडील, पाच बहिणी असा परिवार आहे.