रिक्षेची विद्युत खांबास धडक बसल्याने अपघात ; रिक्षाचालक जखमी…

2

रस्त्यावर असलेल्या विद्युत खांबामुळेच अपघात, नागरिकांचा आरोप…

मालवण, ता. ७ :

येथील मामा वरेरकर नाट्यगृहालगत रस्त्यावरच असलेल्या विद्युत खांबाला रिक्षेने धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षाचालक अर्जुन भाबल रा. मेढा राजकोट हे जखमी झाले. साडे सहा वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला. याच विद्युत खांबाच्या लगत नगरसेवक यतीन खोत व महावितरणचे कर्मचारी पथदिव्यांचे काम करत होते. त्यामुळे धडक बसल्यानंतर मोठा आवाज झाल्याने त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. सुर्दैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. जखमी भाबल यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मेढा राजकोट येथील रिक्षा व्यावसायिक अर्जुन भाबल हे आपल्या ताब्यातील एम. एच. ०७ एस-५३०२ रिक्षा घेऊन बांगीवाडा येथील रस्त्यावरून जात असताना मामा वरेरकर नाट्यगृहालगतच्या रस्त्यावरच असलेल्या विद्युत खांबाला त्यांनी धडक दिली. जोरदार बसलेल्या धडकेत ते गंभीर जखमी झाले. रिक्षेच्या दर्शनी भागाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याचवेळी नगरसेवक खोत व महावितरणचे अधिकारी पथदिव्यांचे काम करत होते. रिक्षेच्या धडकेमुळे मोठा आवाज झाला. यात वीज तारा तुटल्या असत्या तर त्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला असता. सुर्दैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. रिक्षाचालक भाबल यांना तत्काळ स्थानिक नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी हलविले. त्यांच्या डोक्यास व चेहर्‍याला दुखापत झाली आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांकडून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
रस्त्यावरच असलेल्या विद्युत खांबामुळेच अपघात झाल्याचे सांगत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष महेश कांदळकर, सुदेश आचरेकर, गणेश कुडाळकर यांच्यासह अन्य नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली होती. वाहतूक पोलिक कर्मचारी शेखर मुणगेकर हे घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांकडून पंचनामा सुरू होता. अपघातामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.

6

4