वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम प्राचारण करा…

2

सावंतवाडीतील नागरिकांचे वनविभागाला निवेदन;सध्याची यंत्रणा अकार्यक्षम…

*सावंतवाडी ता.०८:* शहरासह परिसरातील नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचा संचार वाढला आहे.मात्र या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाची यंत्रणा अकार्यक्षम ठरली आहे,असा आरोप करत आज येथील नागरिकांनी वन्यप्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करा,या मागणीसाठी आज वनविभागाच्या कार्यालयाला धडक दिली.दरम्यान या प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची टीम सावंतवाडीत प्रचारण करा,अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.या बाबतचे निवेदन त्यांनी कार्यालय अध्यक्ष बळीराम जाधव यांच्याकडे सादर केले.
सध्या मोठ्या प्रमाणात नागरी वस्तीत वन्य प्राण्यांचा संचार वाढला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गेल्या दोन-तीन दिवसात शहरात चार ते पाच अजगर नागरी वस्तीत घुसण्याचे प्रकार समोर आले होते.तर तलावाच्या फूटपाथवर चक्क मगर मुक्तपणे संचार करताना निदर्शनास आली होती.त्या मगरीला स्थानिक युवकांनीच जेरबंद केले होते.तर याआधीच माकड-गवारे अशा वन्य प्राण्यांचे प्रमाण सुद्धा मोठ्या प्रमाणात  वाढले आहे.या प्राण्यामुळे शेती बागायतीचे मोठे नुकसान होत आहे. मात्र या सर्वाचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाकडे कार्यक्षम अशी यंत्रणा नसल्याचा आरोप येथील नागरीकांनी केला आहे.वन्यप्राण्यांना जेरबंद करण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी वनविभागाकडे नसल्यामुळे त्यांना पकडण्यासाठी आपला जीव मुठीत धरून नागरिकांनाच पुढे सरकावे लागत आहे.मात्र यात त्या वन्यप्राण्यांपासून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.त्यामुळे अशा प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रशिक्षित टीम सावंतवाडीत दाखल करा,अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
यावेळी बाबल्या दुभाषी, सत्यजित धारणकर,पुंडलिक दळवी,नकुल पार्सेकर, पूजा जगताप,गणेश पालव,संतोष तळवणेकर,अंकुश राणे,कृतिका कोरगावकर, विश्वनाथ मिशाळ,देवा टेमकर,राजेश लेडीज आदी उपस्थित होते.

9

4