पावसाळा संपला …रस्त्यातील ‘खड्यांचे’ पुढे काय..?

100
2
Google search engine
Google search engine
Google search engine

तालुक्यातील रस्त्यांचा दशावतार; प्रवाशांमधून तीव्र संताप

वैभववाडी/पंकज मोरे.ता,१०: यावर्षी पावसाने राज्यभरात तुफानी ‘बॕटींग’ केली. नोव्हेंबर उजाडला तरीही राज्याच्या कानाकोप-यात अधूनमधून पाऊस बरसत आहे. यामुळे रस्त्यांचा तर दशावतार झाला आहे. वैभववाडी तालुक्यातील रस्त्यांची दुर्दशा हा कायमच चर्चेचा विषय. पावसाळा आला की, रस्ते खड्ड्यात जातात आणि या चर्चेला उधाण येते. आणि नेहमी प्रमाणे आरोप प्रत्यारोपांचा खेळ सुरू होतो. आता पावसाळा संपला आहे. मात्र बांधकाम विभागाने अद्यापही खड्डे भरण्याची मोहिम हाती घेतली नाही. सर्वच ग्रामीण रस्त्यांची अक्षरशः चाळण झाल्याने प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
वैभववाडीत खड्डे दाखवा, एक हजार रुपये मिळवा. अशी घोषणा दोन वर्षापूर्वी बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली होती. परंतु खड्डे दाखवून प्रत्यक्षात एक हजार रुपये मिळाले का? हा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित होत आहे. दरवर्षी रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो. प्रत्यक्षात रस्त्यांची चांगल्या दर्जाची कामे केली जातात का? जर कामाचा दर्जा चांगला असेल तर रस्त्यांची दुर्दशा होण्याचा प्रश्नच निर्माण होणार नाही. ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत त्याठिकाणी ना अधिकारी ना ठेकेदार अशी स्थिती आहे. मग वचक कोणावर ठेवायचा.
तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांसह मुख्य राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे उखडायला लागले आहेत. तळेरे वैभववाडी राष्ट्रीय महामार्गासाठी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. परंतु शासनाच्या या पैशाचा अपव्यय होताना दिसत आहे. तर भुईबावडा ते गगनबावडा राज्यमार्गावर रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. दरवर्षी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च केला जातो. परंतु कामेच निकृष्ट दर्जाची होत असल्याने रस्त्यांची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत जाते. पावसाळा संपला असून बांधकामने मात्र अद्यापही खड्डे बुजविण्यास सुरूवात केलेली नाही. दिवसेंदिवस खड्ड्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. मुळातच रस्त्यांची अभ्यासपूर्ण बांधणी केली जात नाही. किंवा डागडुजी करताना शास्त्रशुद्ध पद्धत अवलंबली जात नाही तोपर्यंत खड्यांचा सामना करावाच लागणार.

\