नारायण राणेंच्या खांद्यावर केंद्रीय मंत्रीपदाची धुरा…?

121
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कोकणात शिवसेनेला रोखण्यासाठी भाजपाकडुन खेळी

सावंतवाडी/अमोल टेंबकर ता.११: राज्यात शिवसेना-भाजपा युतीचे सख्य तुटल्यानंतर आता कोकणात भाजपा बळकट करण्यासाठी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्री पदाची धुरा पक्षाकडून सोपवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.तशी आता चर्चा रंगू लागली आहे.शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता भाजपाच्या भात्यातून कोकणात नारायण राणे,अशी खेळी खेळली जाणार आहे.याबाबत काही पदाधिकाऱ्यांकडून पुष्टी देण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे आपल्या महाराष्ट्र स्वागत पक्षासह आता भाजपवासी झाले आहेत.जरी नितेश राणेंच्या रुपाने त्यांना राज्यात मंत्रिपद मिळण्याची शक्यता कमी असली तरी आता मात्र शिवसेना आणि भाजप हे युती तुटल्यामुळे कोकणात आणि पर्यायाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजप बळकट करण्यासाठी पक्षाकडून आता थेट भूमिका घेतली जाणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता श्री.राणे यांना मानणारा मोठा वर्ग आहे,त्यांचे राजकीय वजन आहे,जिल्ह्यातील महत्वाची सत्तास्थाने त्यांच्याकडे आहेत तसेच रत्नागिरी सुद्धा राणेंचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे.या सर्व गोष्टी लक्षात घेता,या ठिकाणी शिवसेनेला रोखण्यासाठी राणे यांच्या खांद्यावर केंद्रीय मंत्री पदाची धुरा दिली जाण्याची शक्यता आहे.
मागच्या काही दिवसात नारायण राणे यांच्या प्रवेशावरून शिवसेना व भाजपात जोरदार वाद रंगला होता.यावेळी शिवसेनेने प्रथम विरोध व नंतर राणे हा विषय आमच्यासाठी संपला असे सांगून त्यांच्या प्रवेशाला अप्रत्यक्ष हिरवा कंदील दिला होता.त्यानंतर झालेल्या निवडणुका नंतर पालकमंत्री म्हणून नितेश राणे यांना संधी देण्यात यावी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मागणी करण्यात आली होती.तसा भाजपच्या बैठकीत ठराव सुद्धा घेण्यात आला होता.परंतु आता बदलत्या राजकीय घडामोडीनंतर शिवसेना-भाजपा युतीचे सरकार राज्यात येण्याची तूर्तास तरी शक्यता नाही.त्यामुळे त्याचा फटका कोकणाला सहन करावा लागणार आहे.कोकणात भाजप वाढीसाठी गेले अनेक वर्षे पक्षाचे नेते प्रयत्नात आहेत.परंतु त्यांना म्हणावे तसे यश मिळाले नव्हते,आता मात्र शिवसेना भाजपा युती तुटल्यामुळे राणे यांच्या माध्यमातून या ठिकाणी पक्ष मजबूत करण्यासाठी भाजपला संधी मिळणार आहे.त्यामुळे पर्यायाने दीपक केसरकर व वैभव नाईक उदय सामंत आदि सेनेच्या नेत्यांना टक्कर देण्यासाठी भाजपा आयत्यावेळी हा पर्याय वापरण्याची शक्यता आहे.

\