आमदार बीचवर वजन कमी करतोय, खासदार राज्यपालांकडे बिस्कीट खातोय…

106
2
Google search engine
Google search engine
Google search engine

माजी खास. नीलेश राणेंची बोचरी टीका : देवबागात टेट्रापॉड बंधाऱ्यासाठी पाठपुरावा करणार…

मालवण, ता. १३ : देवबागचा बंधारा वाहून गेला असताना या गावातून कमी मतदान झाल्याने विद्यमान आमदाराने या गावावर दुर्लक्ष केले. सध्या आमदार मुंबईतील बिचवर वजन कमी करतोय तर खासदार राज्यपालांकडे जाऊन बिस्कीट खातोय अशी बोचरी टीका माजी खासदार नीलेश राणे यांनी आज येथे केली. देवबाग गावच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभी राहणार आहे. गावच्या संरक्षणासाठी याठिकाणी टेट्रापॉडचा बंधारा व्हावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे श्री. राणे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान देवबागच्या बंधार्‍याचे सध्या सुरू असलेले काम बोगस असल्याचे स्पष्ट करत संबंधित ठेकेदारास हे काम तत्काळ बंद करण्याच्या सूचना दिल्या. यासंदर्भात त्यांनी पतन विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधत नव्याने प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या.
माजी खासदार डॉ. नीलेश राणे यांनी आज देवबाग गावास भेट देत सुरू असलेल्या बंधार्‍याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाबा मोंडकर, अशोक सावंत, अशोक तोडणकर, बाबा परब, आशिष हडकर, सनी कुडाळकर, मोहन कुबल यांच्यासह भाजपचे अन्य पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
देवबाग येथील तिनशे मीटरचा बंधारा लाटांच्या मार्‍यात उद्ध्वस्त झाला. समुद्राच्या अजस्र लाटांचे पाणी या बंधार्‍यावरून वस्तीत घुसत असल्याने ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. याठिकाणी बंधार्‍याच्या कामास मंजुरी मिळाली आहे. मात्र ६४ मीटरच्या बंधार्‍याच्या दुरूस्तीसाठी २५ लाख रुपये मंजूर झाले असून या निधीत होत असलेले काम बोगस आहे. या दगडांचा वापर करून हा बंधारा टिकणे अशक्य आहे. त्यामुळे हे काम तत्काळ थांबविण्याच्या सूचना त्यांनी संबंधित ठेकेदारास दिल्या. यासंदर्भात त्यांनी पतन विभागाच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून नव्याने प्रस्ताव तयार करत याठिकाणी टेट्रापॉड बंधारा बांधणे गरजेचे आहे असे स्पष्ट केले. याबाबत लवकरच निवेदन देऊ असे स्पष्ट केले.

\