वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन…
वेंगुर्ले : ता.१३
राज्यात राष्ट्रपती राजवट सुरू असून प्रशासनाने यावर्षी झालेली अतिवृष्टी तसेच परतीचा अवकाळी पाऊस व त्याचबरोबर क्यार नामक चक्रीवादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेती मच्छीमार व्यवसाय पुर्णतः कोलमडून पडला असल्याने सिंधुदुर्गात ओला दुष्काळ जाहीर करावा व झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकरी व मच्छीमारांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशा मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य एम. के. गावडे यांच्या नेतृत्वाखाली वेंगुर्ला तालुका राष्ट्रवादी कार्यकारणीच्या वतीने वेंगुर्ले तहसीलदार प्रवीण लोकरे यांना देण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामात सातत्याने पाऊस सुरू राहिला. कोकणात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले. थोडेफार उत्पन्न शेतकऱ्यांना मिळण्याची आशा होती. परंतु परतीच्या पावसामुळे तसेच क्यार वादळामुळे जिल्ह्यातील शेतकरी निस्तनाभूत झाला. अतिवृष्टीत काबाडकष्ट करून घेतलेले भातपिक कापणीस तयार झालेले असताना परतीच्या अवकाळी पावसामुळे भातपिकांची पडझड होऊन पिकलेले भातपिक जागेवरच रुजले. अशा भाताचा उपयोग तांदूळ काढण्यासाठी होणार नाही.
तसेच जिल्ह्यातील मच्छीमारांचे सुरवातीच्या अतिवृष्टीत व परतीच्या पावसावेळी झालेले क्यारवादळ यामुळे मच्छीमार व्यवसायावर संकट ओढावले आहे. यातच समुद्राच्या उधाणाचे पाणी घुसून मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मासेमारी हंगाम सुरू असूनही मच्छीमार नौका किनाऱ्यावर आहे. त्यामुळे मच्छीमारांनासुद्धा नुकसान भरपाई देणे तेवढेच गरजेचे आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश रस्ते खड्डेमय झालेले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हापरिषद बांधकाम विभाग यांनी याविषयी गंभीर दखल घेऊन जनतेला होणाऱ्या त्रासावर उपाययोजना करावी. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा निद्रास्त अवस्थेत आहेत. जिल्ह्यामध्ये अनेक शाळकरी विद्यार्थ्यांचा तापसरीमध्ये मृत्यू होत आहे. यामागचे कारण आरोग्य विभागाने शोधून उपाययोजना कराव्यात.
विधानसभा निवडणुकी होऊन कोणत्याही एका पक्षाने सत्ता स्थापन न केल्याने यासाठी राज्यपाल यांनी आपल्या अधिकारांचा उपयोग करून शेतकरी, मच्छीमारांना न्याय मिळवून द्यावा. शेतकऱ्यांनी घेतलेले बँकेचे कर्ज भरू न शकत नसल्याने संबंधित शेतकऱ्यांचे व मच्छीमारांचे संपूर्ण कर्ज माफ करावे. तसेच भातपिक शेतकऱ्यांना हेक्टरी कमीत- कमी ६० हजार नुकसान भरपाई दयावी. तसेच वाढलेल्या पावसाच्या मुदतीमुळे आंबा, काजू हंगाम पुढे गेल्यामुळे त्याचा थेट परिणाम आंबा बागायतदारांच्या उत्पन्नावर होणार आहे. त्यामुळे संबंधित तज्ञ शास्त्रज्ञांची समिती नेमावी. अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा नम्रता कुबल, महिला तालुकाध्यक्ष दीपिका राणे, तालुका अध्यक्ष धर्माजी बागकर, उपाध्यक्ष योगेश कुबल, शहर अध्यक्ष सत्यवान साटेलकर, युवक अध्यक्ष रोहन वराडकर, वामन कांबळी, मिलिंद रेडकर, आनंद मोचेमाडकर, नितीन कुबल, भारत धरणे, सचिन शेट्ये आदी उपस्थित होते.