अधिकारी, ठेकेदाराला धमकावत असाल तर सहन करणार नाही…

83
2
Google search engine
Google search engine
Google search engine

हरी खोबरेकर ; स्वखर्चाने बंधारा बांधणारे जिल्हा पदाधिकारी गेले कुठे? मंदार केणींचा खोचक सवाल…

मालवण, ता. १४ :

देवबागवासियांवर सध्या ओढवलेली परिस्थितीला राणे समर्थक मंडळीच जबाबदार आहेत. तेच आपल्या पापाचे कर्म आमच्या माथी मारण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. मात्र शिवसेनेच्यावतीने देवबागवासियांच्या संरक्षणासाठी नियोजनबद्धरीत्या निधी आणून बंधार्‍याच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. अशा स्थितीत हे काम बंद करण्यासाठी अधिकारी, ठेकेदाराला भाजपचे नेते, पदाधिकारी धमकावत असतील तर ते त्या भागाचा जिल्हा परिषद सदस्य एक लोकप्रतिनिधी म्हणून सहन करणार नाही असा इशारा शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान सत्ताधार्‍यांनी बंधारा नाही बांधला तर स्वखर्चातून बंधारा बांधून देणार असे सांगणारे जिल्हास्तरीय पदाधिकारी कुठे गायब झाले असा प्रश्‍न मंदार केणी यांनी उपस्थित केला.
येथील तालुका शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यात माजी खासदार नीलेश राणे यांनी केलेल्या टीकेचा त्यांनी खरपूस समाचार घेतला. यावेळी मंदार केणी, बाबी जोगी, गणेश कुडाळकर, पंकज सादये, यतीन खोत, बंड्या खोत, प्रवीण लुडबे, किसन मांजरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
श्री. खोबरेकर म्हणाले, माजी खासदार नीलेश राणे हे पर्यटक असल्यासारखे येथे येतात आणि काहीही बोलून जातात. गेल्या पाच वर्षात देवबागात एकही दगड पडला नाही अशी ओरड राणे समर्थक मंडळी मारत होती. तांत्रिक अडचणीमुळेच बंधार्‍याचे काम रखडले होते. देवबाग गावावर जी परिस्थिती ओढवण्यास हीच मंडळी कारणीभूत आहे. बंधारा ढासळल्याने सहा ते सात ठिकाणी तत्काळ दुरूस्ती होणे आवश्यक होते. यासाठी दोनशे ते तीनशे किलोचा दगड वापरणे गरजेचे असल्याने त्यादृष्टीने आवश्यक पाठपुरावा करून बंधार्‍याच्या दुरूस्तीसाठी साडे बावीस लाखाचा निधी उपलब्ध केला. पतन विभागानेच हा आराखडा बनविला असून त्यानुसारच काम सुरू आहे. देवबाग गावातून लोकसभेपेक्षा विधानसभेत शिवसेनेला चांगले मताधिक्य मिळाल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. त्यामुळेच ते कामात विघ्न आणत आहेत. मात्र या बंधार्‍याच्या दुरूस्तीचे काम बंद करण्यासाठी अधिकारी, ठेकेदाराला भाजपचे नेते, पदाधिकारी धमकावत असतील तर ते सहन करणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
देवबागच्या संरक्षणासाठी अडीच कोटी रुपयांचा जिओ ट्यूबचा बंधारा मंजूर झाला आहे. सध्या मासेमारी हंगाम असल्याने डिसेंबर महिन्यात मच्छीमारांच्या विनंतीनुसार हे काम होईल. देवबागवर जेव्हा समुद्री लाटांचे संकट ओढवलेले असते तेव्हा माजी खासदार बंगल्यात झोपून असतात. तर संकटाच्या ठिकाणी आम्हीच सातत्याने धावून गेलो आहोत. देवबागपर्यत जाणार्‍या रस्त्याच्या कामासाठीही निधी मंजूर झाला आहे हे कामही लवकरच सुरू होईल. चक्रीवादळ, अतिवृष्टीमुळे मच्छीमार, शेतकरी, पर्यटन व्यावसायिकांचे नुकसान झाले आहेत. यात कोणताही पक्षभेद केलेला नाही. सर्व नुकसानग्रस्तांचे पंचनामे करण्याच्या सूचना पालकमंत्री, आमदार यांनी दिल्या. त्यानुसारच कार्यवाही झाली त्यामुळे विरोधकांनी तहसील कार्यालयातून माहिती घ्यावी आणि नंतरच आरोप करावेत असेही श्री. खोबरेकर यांनी सांगितले.

\