मधुमेह संशोधन केंद्र मधुमेही रुग्णांसाठी लाभदायक ठरेल…

2

तहसीलदार अजय पाटणे ; जिल्ह्यातील पहिल्या मधुमेह संशोधन केंद्राचे उदघाटन…

मालवण, ता. १४ :
आपले आयुष्य महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते जगताना पूर्वतयारी करणे आवश्यक आहे. निरोगी, सुदृढ आरोग्य राहण्यासाठी आवश्यक काळजी घ्यायला हवी. मधुमेही रुग्णांचे वाढते प्रमाण लक्षात घेता यावर नियंत्रण मिळविण्यासाठी रेडकर हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटरच्यावतीने जिल्ह्यातील पहिल्या मधुमेह संशोधन केंद्र येथे सुरू झाले आहे. हे केंद्र मधुमेहींनी लाभदायक ठरेल असे प्रतिपादन तहसीलदार अजय पाटणे यांनी येथे केले.
     जागतिक मधुमेह दिनाच्या निमित्ताने येथील रेडकर हॉस्पिटल ट्रस्ट व रिसर्च सेंटरच्यावतीने जिल्ह्यातील पहिल्या मधुमेह संशोधन केंद्राचे उद्घाटन तहसीलदार अजय पाटणे व डॉ. सुभाष दिघे यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले. कार्यक्रमास हृदयरोग तज्ज्ञ डॉ. विवेक रेडकर, डॉ. दर्शन खानोलकर, डॉ. गार्गी ओरसकर, डॉ. धनंजय क्षीरसागर, विकी तोरसकर, डॉ. रामचंद्र चव्हाण यांच्यासह मधुमेह रुग्ण उपस्थित होते. मधुमेहाचा आजार बळावू नये त्यावर काबू मिळावा यासाठी प्रातिनिधिक स्वरूपात सीजीएमएस चीप पत्रकार समितीचे अध्यक्ष प्रफुल्ल देसाई, छायाचित्रकार समीर म्हाडगुत यांना बसविण्यात आली.
     डॉ. दिघे म्हणाले, जगभरात मधुमेह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे या आजारावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. मधुमेही रुग्णांनी नियमित तपासणी न केल्यास विविध प्रकारच्या सहा आजारांना निमंत्रण मिळते. त्यामुळे आजार झाल्यानंतर लाखो रुपये खर्च करण्यापेक्षा सुरवातीपासूनच त्यावरील उपाययोजना सुरू केल्यास मधुमेहावर नियंत्रण मिळविता येणे शक्य आहे. यादृष्टीकोनातून डॉ. विवेक रेडकर व त्यांच्या सहकार्‍यांनी मधुमेह संशोधन केंद्राच्या माध्यमातून अत्यंत आवश्यक पाऊल उचलले आहे. मधुमेहामुळे मृत्यूच्या प्रमाणातही वाढ होत असल्याने रुग्णांनी आवश्यक ती काळजी घ्यावी.
     डॉ. रेडकर म्हणाले, मधुमेह रुग्ण जे जन्मजात व वयोमानानुसार सापडून येत आहेत. पूर्वी पन्नाशीनंतर मधुमेह रुग्ण आढळून यायचे मात्र आता तिशीतच मधुमेहाचे रुग्ण आढळून येत असून ही बाब गंभीर आहे. यासाठी तरुण पिढीने आपली लाईफस्टाईलमध्ये बदल करायला हवा. मधुमेह आजार टाळावा यासाठीच जिल्ह्यातील पहिले संशोधन केंद्र येथे सुरू करण्यात आले आहे. दारिद्र्य रेषेखालील मधुमेह रुग्णांची दर तीन महिन्यांनी मोफत तपासणी केली जाणार आहे. मधुमेही रुग्णांना इन्सुलिन लागू नये यासाठीच रेडकर हॉस्पिटल ट्रस्ट आणि रिसर्च सेंटरच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. २१ नोव्हेंबरला जिल्ह्यातील लहान मुलांची तपासणी मोफत केली जाणार आहे.
     यावेळी डॉ. ओरसकर यांनी मधुमेही रुग्णांना आहार कोणत्या प्रकारचा घ्यायचा याविषयी मार्गदर्शन केले. १४ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत मधुमेह नियंत्रण सप्ताह साजरा केला जाणार आहे. यात तालुक्यातील मधुमेह रुग्णांची मोफत तपासणी केली जाणार आहे. २१ नोव्हेंबरला प्रियंका सहस्रभोजनी या जन्मजात मधुमेह असलेल्या मुलांच्या पालकांना मधुमेह व लहान मुलांमधील मानसिक आरोग्य या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. तालुक्यातील ग्रामीण भागात फिरती व्हॅन ठेवून मधुमेह रुग्णांची तपासणी करण्याचा उपक्रमही राबविण्यात येणार असल्याची माहिती यावेळी विकी तोरसकर यांनी दिली.
     प्रास्ताविक विकी तोरसकर यांनी केले. रामचंद्र चव्हाण यांनी आभार मानले.

8

4