तळेरे बाजारपेठ येथील घटना : १ लाख ६५ हजाराचा ऐवज….
कणकवली, ता.१६ :
तालुक्यातीलतळेरे बाजारपेठ येथील प्रमोद महिपत वायंगणकर यांच्या घरात बेडरूममध्ये ठेवलेला सोन्याच्या दागिन्यांचा डबा, त्यांच्याकडेच ट्रॅक्टरचालक म्हणून कामाला असलेल्या नोकराने लांबवला. हा प्रकार काल (ता.१५) रात्री आठच्या सुमारास लक्षात आला. तोपर्यंत ट्रॅक्टरवर असलेला नोकर फरार झाला होता. वायंगणकर यांनी या चोरीची फिर्याद आज पोलिस ठाण्यात दिली.
प्रमोद वायंगणकर यांच्याकडे गेल्या पंधरा दिवसापासून कर्नाटक राज्यातील साळुंखे नामक व्यक्ती ट्रॅक्टर चालक म्हणून कामाला होती. दोन दिवसापूर्वी हा ट्रॅक्टर चालक पंढरपूर यात्रेला गेला होता. काल (ता.१५) तो सकाळी तळेरे बाजारपेठेतील वायंगणकर यांच्या घरात आला होता. सायंकाळी आठ वाजल्यापासून तो अचानक गायब झाला. त्याचेवळी वायंगणकर यांच्या घरातील बेडरूमधील डबा नाहीसा झाल्याचे लक्षात आले. या डब्यामध्ये सोनसाखळी, कानातील रिंग, नथ, डूल आदी ६ तोळ्याचे दागिने होते. वायंगणकर यांनी ट्रॅक्टर चालक असलेल्या साळुंखे याच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो बंद लागला. त्यानंतर आज दिवसभरात त्या ट्रॅक्टर चालकाचा कुठेच शोध लागला नाही. त्यामुळे त्यानेच दागिने चोरून नेले असावेत अशी फिर्याद प्रमोद वायंगणकर यांनी आज येथील पोलिस ठाण्यात दिली.