ओएलएक्सवर होती जाहीरात : चोरटा सावंतवाडीतील असल्याचा संशय…
कणकवली, ता.16 :
ओएलएक्स या संकेतस्थळावर कणकवलीतील एका ग्राहकाने आपली दुचाकी विक्रीची जाहिरात केली होती. त्यानुसार सावंतवाडीतील एक ग्राहक दुचाकी खरेदीच्या व्यवहारासाठी आला. त्याने दुचाकीची ट्रायल मारून पाहिली. खरेदीचा व्यवहार पक्का केला. एटीएममधून पैसे आणतो असे सांगून दुचाकी घेऊन गेला तो अद्यापही परतलेला नाही. या प्रकारात कणकवलीतील दिलीप दिनकर करंजेकर यांची फसवणूक झाली आहे. त्याबाबतची फिर्याद उशिरा पोलिस ठाण्यात नोंदवली जात होती.
कणकवली बाजारपेठेत दुकान असलेल्या दिलीप करंजेकर यांनी ओएलएक्स या वेबसाइटवर आपली टीव्हीएस एन्टार या दुचाकी विक्रीची जाहिरात दिली होती. आज दुपारी दीड वाजता सांवतवाडीतून एक व्यक्ती जाहिरात पाहून दुचाकी खरेदीसाठी आली. त्याने दुचाकी चालवून पाहिली. त्यानंतर 60 हजार रुपयांना व्यवहार ठरला. सावंतवाडीतून आलेल्या त्या ग्राहकाने एटीएममधून जाऊन पैसे आणतो असे सांगून दुचाकी घेऊन गेला. त्यांनतर तो अद्यापही परतला नाही. यामुळे या व्यवहारात आपली फसवणूक झाल्याची तक्रार दिलीप करंजेकर यांनी आज कणकवली पोलिस ठाण्यात दिली. दरम्यान सावंतवाडीतून आलेली त्या व्यक्तीने आपले नाव सांगितले नाही. मात्र एका खासगी बँकेत कामाला असल्याचे त्याने सांगितले होते असेही श्री.करंजेकर यांनी सांगितले.