शेतकऱ्यांना भात शेती नुकसानीपोटी हेक्टरी ८ हजार ही निव्वळ चेष्टा….

179
2
Google search engine
Google search engine
Google search engine

एम.के.गावडे : हेक्टरी ६० हजार नुकसान भरपाई हवी…

वेंगुर्ले : ता.१८
महराष्ट्रात पूरग्रस्त व अवकाळी पावसामुळे शेतकरी नामशेष झाला आहे. भातशेतीसाठी हेक्टरी ६० हजार नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आम्ही केली होती असे असताना राज्यपाल यांनी भातशेतीसाठी प्रति हेक्टरी ८ हजार व फळबाग साठी प्रति हेक्टरी १८ हजार रुपयांची नुकसान भरपाई जाहीर करून शेतकऱ्यांची निव्वळ चेष्टा केली आहे अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, वेंगुर्ला खरेदी विक्री संघाचे चेअरमन, कृषिभूषण एम के गावडे यांनी व्यक्त केली आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या लोकांनी भरीव नुकसान भरपाईची मागणी केली होती. मात्र राज्यपाल यांनी खरीब शेतीसाठी प्रति गुंठा ८० व फळबागासाठी प्रति गुंठा १८० रुपये नुकसान भरपाई जाहिर केली. प्रतिगुंठा शेती करण्यासाठी शेतकऱ्यालाया १५०० ते २००० रुपये खर्च येतो. त्यामधून कमीत कमी ४ हजार रुपयांचे उत्पन्न मिळावे अशी शेतकऱ्याची अपेक्षा असते. यामुळे जेव्हा शासन प्रति गुंठा ८० रु नुकसान भरपाई देण्याची घोषणा करते त्यावेळी या गोष्टीची कीव येते. राज्यपाल यांनी या नुकसान भरपाईचे आकडे कोणत्या निकषावर लावले हेच लक्षात येत नाही. कृषी विभाग किंवा महसूल अधिकाऱ्यांना राज्यपाल यांनी ही आकडेवारी दिली असेल तर त्याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.
कालपर्यंत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे १० हजार कोटींची तरतूद झाली आहे असे सांगत होते मात्र ही तरतूद फारच अपुरी आहे असे सर्वच राजकीय पक्ष सांगत असताना प्रति गुंठा ८० रुपये जाहीर करणे म्हणजे मेलेल्याच्या ताळुवरील लोणी खाण्यासारखे आहे. जर शासनाच्या तिजोरीत खडखडाट असेल तर त्यांनी शेतकऱ्यांची माफी मागून नुकसान भरपाई देता येत नाही असे जाहीर करावे व बळीराजाची चेष्टा थांबवावी. लोकनियुक्त सरकार स्थापन झाल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही यामुळे सर्वांनी लवकर एकत्र यावे. राज्यपाल यांची ही घोषणा फसवी असून ती भाजपच्या कार्यक्रमाचा एक भाग आहे. आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांसाठी आतापासूनच शात्रज्ञ मार्फत अभ्यास करणे आवश्यक आहे अन्यथा द्राक्षे, डाळिंब बागायतदारां प्रमाणेच कोकणातील शेतकरी नामशेष होईल असे एम के गावडे यांनी सांगितले.

\