बांदा-तेरेखोल येथे महसूलने जप्त केलेल्या वाळू साठयाची चोरी…

255
2
Google search engine
Google search engine
Google search engine

साईप्रसाद कल्याणकर; तस्करांना अधिकारी पाठीशी घालत असल्याचा आरोप…

बांदा ता.२४: शेर्ले येथील तेरेखोल नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा सुरू असून या वाळू माफियांना महसूल मंडळ अधिकारी व तलाठी यांचे संरक्षण असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी केला आहे.महसूल प्रशासनाने महिनाभरापूर्वी जप्त केलेला ६ ब्रास वाळू साठा महसुलाच्या आशीर्वादानेच चोरीस गेल्याची तक्रार कल्याणकर यांनी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांचेकडे केली आहे. कल्याणकर यांनी बेकायदा वाळू उपशाचे चित्रीकरण केले.तक्रारीत त्यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शेर्ले नदीपात्रात दिवस-रात्र विनापरवाना वाळू उपसा सुरू आहे. याबाबत कल्याणकर यांनी तक्रार केली होती. त्यानुसार महसूल प्रशासनाने धाड टाकून ६ ब्रास बेकायदा वाळू जप्त केली होती. तसेच पुन्हा नदीपात्रात वाळू उपसा करताना आढळल्यास कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते.
मात्र महसुलाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत नदीपात्रात बेकायदा वाळू उपसा सुरूच होता. नदीतील वाळू काढून लगतच वाळूचा साठा करण्यात येत होता. कल्याणकर यांनी घटनास्थळी जाऊन याचे चित्रीकरण केले. मात्र वाळू काढणाऱ्या व्यावसायिकांनी तेथून पलायन केले. यावेळी महिनाभरापूर्वी जप्त केलेला ६ ब्रास वाळू साठा त्याठिकाणी नसल्याचे निदर्शनास आले. सदरची जप्त केलेली वाळू माफियांनी चोरून नेल्याचे कल्याणकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. याबाबत स्थानिक महसूल अधिकाऱ्यांना कल्पना देऊनही कारवाई करण्यात येत नसल्याचा आरोप कल्याणकर यांनी केला आहे. वाळू माफियांवर लवकरात लवकर कडक कारवाई करावी अशी मागणी कल्याणकर यांनी निवेदनात केली आहे.

\