कोकण विभागीय पोलिस क्रीडा स्पर्धेचे यजमान पद यावर्षी सिंधुदुर्गकडे…

2

ओरोस ता.२५:

क्रीडा स्पर्धा पोलिस विभागाचा महत्वाचा भाग आहे. वर्षभर पोलिस अधिकारी-कर्मचारी ताणतणावाखाली व जबाबदारीच्या ओझ्याखाली असतात. त्यातून त्यांना विसावा मिळावा. त्यांच्यातील खेळाडूला व्यासपीठ मिळावे. यासाठी प्रतिवर्षी पोलिस क्रीडा स्पर्धा जिल्हा, विभाग, राज्य व राष्ट्रीय स्तरावर होत असतात. यावर्षी कोकण विभागीय स्पर्धेचे यजमान पद सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाले असून आज (सोमवारी) त्याचे उद्घाटन झाले आहे. 30 नोव्हेंबर रोजी याचा समारोप बक्षीस वितरण कार्यक्रमाने होणार आहे. यासाठी नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस निरीक्षक निकेत कौशिक उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबत माहिती देण्यासाठी गेडाम यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी प्रभारी गृह उपअधीक्षक संध्या गावडे, पोलिस निरीक्षक प्रल्हाद पाटील उपस्थित होते. 2019 च्या सिंधुदुर्ग जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या असून साखळी पद्धतीने 46 व्या कोकण परिक्षेत्रीय पोलिस क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाचा मान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. जिल्हा पोलिस ग्राउंड, जिल्हा क्रीडा संकुल येथे या स्पर्धा 25 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत संपन्न होत आहेत. या स्पर्धेत सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, नवी मुंबई या सहा जिल्ह्यातील पोलिस खात्यातील खेळाडू सहभागी झाले आहेत. सुमारे 800 खेळाडूंचा यात समावेश असून यासाठी पोलिस खात्याव्यतिरिक्त राज्य, राष्ट्रीय स्तरावरील पंच निमंत्रित करण्यात आले आहेत, असे यावेळी गेडाम यांनी सांगितले.
सहभागी खेळाडूंत अनेक खेळाडू राष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत. यात सांघिक व वैयक्तिक खेळांचा समावेश आहे. विजेत्या खेळाडू व संघाला सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देण्यात येणार आहे. याप्रमाणेच सहभागी पंचांचा सुद्धा सन्मान करण्यात येणार आहे. 30 नोव्हेंबर रोजी सायंकाळी या स्पर्धेचा समारोप मान्यवारांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी पोलिस कुटुंबिय यांचाही कार्यक्रम होणार असून सांस्कृतिक कार्यक्रमाने याची सांगता होणार आहे, असे यावेळी गेडाम म्हणाले.

9

4