Monday, November 11, 2024
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामालवण पालिकेतील आर्थिक गैरव्यवहाराचे स्टिंग ऑपरेशन...

मालवण पालिकेतील आर्थिक गैरव्यवहाराचे स्टिंग ऑपरेशन…

नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा अन्यथा तो देण्यास भाग पाडू- सुदेश आचरेकर-गणेश कुशे यांचा इशारा…

मालवण, ता. २६ :

ठेकेदाराला बिलाचा धनादेश देण्यासाठी ७२ हजार रुपयांची रक्कम पालिकेतील अधिकार्‍यांनी घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेज त्याचबरोबर नगराध्यक्ष, ठेकेदार, पालिकेतील आवेक्षक यांच्यातील मोबाईल संभाषणही सादर करत माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, गटनेते गणेश कुशे यांनी स्टिंग ऑपरेशनद्वारे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या स्वच्छ व पारदर्शक कारभाराचा पर्दाफाश केला. नगराध्यक्षांनी पालिकेच्या इतिहासाला कलंक फासला असून शहरवासियांचा विश्‍वासघात केला आहे. त्यामुळे याची नैतिकता स्विकारत नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडू असा इशाराही श्री. आचरेकर, श्री. कुशे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
दरम्यान याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांना सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल संभाषणासह निवेदन सादर करत सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे. याचबरोबर त्रयस्थ व्यक्तीने ठाणेतील लाचलुचपत विभागाकडेही तक्रार केली असल्याची माहिती मिळाल्याचे श्री. आचरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
तालुका भाजप कार्यालयात पत्रकार परिषद झाली. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, गटनेते गणेश कुशे, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, दीपक पाटकर, जगदीश गावकर, आबा हडकर, ममता वराडकर, पूजा सरकारे, भाऊ सामंत, मोहन वराडकर, लीलाधर पराडकर, जॉन नर्‍होंना, दिलीप वायंगणकर, भाई मांजरेकर, दादा वाघ, जाबीर खान यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकार परिषदेच्या सुरवातीस भाजपच्यावतीने ठेकेदाराच्या बिलाच्या धनादेशासाठी पालिकेत झालेल्या आर्थिक व्यवहाराचे सीसीटीव्ही फुटेज तसेच नगराध्यक्ष, आवेक्षक व ठेकेदार यांच्यातील मोबाईल संभाषणाचे सादरीकरण करण्यात आले. यानंतर श्री. आचरेकर म्हणाले, सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर आम्हा सर्वांना धक्का बसला आहे. या फुटेजवरून नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या स्वच्छ व पारदर्शक कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. स्वच्छ प्रतिमेचा बुरखा पांघरलेल्या नगराध्यक्षांनी पालिकेच्या इतिहासाला कलंक लावला आहे. जनतेचा विश्‍वासघात केला आहे. पालिकेचे अधिकारी, कर्मचारी वर्गाचा या आर्थिक व्यवहारात सहभाग असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे स्टिंग ऑपरेशनद्वारे हे सत्य आम्ही उजेडात आणले आहे. नगराध्यक्षांनी निवडून आल्यावर तीन वर्षापूर्वी घेतलेल्या शपथेचा त्यांना विसर पडल्याचे यावरून दिसून आले आहे. कर्मचारी, अधिकारी हे संगनमताने भ्रष्टाचार करत असतील तर पालिकेचे दुर्दैव आहे.
पालिकेत झालेल्या आर्थिक व्यवहाराचा पालिकेचे गटनेते गणेश कुशे यांनी जाहीर निषेध केला. रॉयल प्ले इग्विपेमेंटच्या ठेकेदाराकडून बिलाचा धनादेश मिळण्यासाठी ७२ हजार रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून दिसून आले आहे. नगराध्यक्ष प्रामाणीक असल्याचे वाटले होते. मात्र त्याचे खरे रूप कालांतराने दिसून आले. पक्षात येण्यासाठी त्यांनी अनेक ठेकेदारांना धमकावले आहे. ६४ नंबरच्या स्लिपवर आपली स्वाक्षरी आहे हे ते सातत्याने ठेकेदारांना सांगत होते ते का सांगत होते हे आता लक्षात आले आहे. स्टिंग ऑपरेशनमुळे त्यांच्या स्वच्छ कारभाराचा पर्दाफाश झाला असून नगराध्यक्षांनी राजीनामा द्यावा अन्यथा त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडू असा इशाराही श्री. कुशे यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments