कणकवलीतील चौपदरीकरण आज पुन्हा बंद पाडले…..

2

ठेकेदार फसवणूक करीत असल्याचा नागरिकांचा आरोप…..

कणकवली, ता.२६ :
शहरातील गांगोमंदिर परिसरात आज सकाळी चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. याची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन चौपदरीकरणाचे काम पुन्हा बंद पाडले. गांगोमंदिर येथील अंडरपास कामाची अंतिम मंजूरी दाखवा आणि नंतरच काम सुरू करा असा इशाराही नागरिकांनी दिला.
 शहरातील टेंबवाडी येथील नागरिकांचा विरोध असतानाही आज सकाळी दहाच्या सुमारास चौपदरीकरणाचे काम सुरू करण्यात आले. याची माहिती मिळताच शिशिर परुळेकर, प्रदीप मांजरेकर, महेश सावंत, सचिन म्हाडगूत, नीलेश गोवेकर, सिद्धेश शेट्ये, रामदास मांजरेकर आदी नागरिक एकत्र आले.  या सर्वांनी माती कामासाठी आलेला जेसीबी, डंपर तसेच ठेकेदारांच्या कामगारांना तेथून माघारी पाठवले.
 चौपदरीकरण काम बंद झाल्यानंतर दिलीप बिल्डकॉनचे प्रतिनिधी श्री.शुक्ला यांनी शिशिर परुळेकर यांच्याशी संपर्क साधला. मात्र गांगोमंदिर येथे अंडरपास मंजूर झाल्याचे पत्र दाखवा आणि नंतरच चौपदरीकरण काम सुरू करा असा इशारा श्री.परुळेकर यांनी दिला. गांगोमंदिर येथे अंडरपास मंजूर झाल्याचे ठेकेदाराकडून सांगितले जातेय. तर महामार्ग विभागाकडून जुन्या आराखड्यानुसारच काम सुरू असल्याचे सांगितले जाते. गांगोमंदिर येथील अंडरपासचा प्रस्ताव केंद्राकडे गेला आहे. मात्र त्याला मंजूरी मिळालेली नाही. परंतु ठेकेदार चुकीची माहिती देऊन शहरवासीयांनी दिशाभूल करत असल्याचा आरोप प्रदीप मांजरेकर, शिशिर परुळेकर आदींनी केला. तसेच जोपर्यंत अंडरपास मंजूर होत नाही तोपर्यंत चौपदरीकरणाचे काम सुरू होऊ देणार नसल्याचाही इशारा त्यांनी दिला. त्यानंतर आज दिवसभर जानवली पूल ते एस.एम.हायस्कूल परिसरातील चौपदरीकरणाचे काम बंद ठेवण्यात आले होते.

3

4