भाजपच्या नगरसेवकांकडून नगराध्यक्षांचा निषेध ; आचरेकर- खोत यांच्यात हमरातुमरी…
मालवण, ता. २७ : पालिकेतील आर्थिक गैरव्यवहाराच्या स्टिंग ऑपरेशननंतर आजची पालिकेची सभा गदारोळात पार पडली. भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात काळ्या फिती लावून प्रवेश करत नगराध्यक्षांचा जाहीर निषेध केला. भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या नगराध्यक्षांना पिठासीन अधिकारी म्हणून बसण्याचा अधिकार नाही त्यामुळे त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. घोषणाबाजीमुळे सभागृहात शिवसेना- भाजप नगरसेवक आमनेसामने आले. याच गदारोळात सहाही विषयांवरील ठराव बहुमताने मंजूर करत सभागृहाचे कामकाज संपल्याचे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सांगितले.
सभा संपल्यानंतरही गदारोळ सुरू होता यात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व शिवसेनेत प्रवेश केलेले नगरसेवक यतीन खोत यांच्यात हमरातुमरी झाल्याने नगरपालिकेत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून आले. या दोघांना अन्य नगरसेवकांनी बाजूला केल्याने वाद टळला.
कालच्या स्टिंग ऑपरेशनचे आजच्या नगरपरिषदेच्या सभेत काय पडसाद उमटतात याकडे लक्ष लागले होते. साडे अकरा वाजता सभेचे काम सुरू झाल्यानंतर भाजप, अपक्ष नगरसेवकांनी काळ्या फिती लावत सभागृहात येत नगराध्यक्षांचा निषेध करण्यास सुरुवात केली. यावेळी गटनेते गणेश कुशे, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर यांनी पालिकेतील आर्थिक गैरव्यवहाराचे सीसीटीव्ही फुटेज, संभाषण उघड झाले आहे. याची चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत अशा नगराध्यक्षांना पिठासन अधिकारी म्हणून बसता येणार नाही. त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. यात शिवसेना नगरसेवकांनी सभेचे कामकाज सुरू ठेवा असे सांगितले. शिवसेना व भाजप नगरसेवक आमने-सामने आले. त्यांनी चोर आले रे चोर आले अशी शेरेबाजी केली. यावर भाजपसह अपक्ष नगरसेवक सुदेश आचरेकर यांनीही तुम्ही महाचोर असे म्हटले. या दरम्यान सभेपुढील सर्व विषयांचे ठराव बहुमताने मंजूर करत सभागृहाचे कामकाज संपल्याचे सांगत नगराध्यक्ष सभागृहातून बाहेर पडले.
सभा संपल्यावर सभागृहातच माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, नगरसेवक यतीन खोत यांच्यात हमरातुमरी झाली. अन्य नगरसेवकांनी मध्यस्थी करत त्या दोघांनाही बाजूला केले. या प्रकारामुळे नगरपरिषदेतील वातावरण काहीकाळ तंग बनले होते.