विरोधकांचे आरोप वैफल्यग्रस्त बनल्यानेच ; तंत्रज्ञानाचा वापर करून व्हिडीओ, ओडिओत बदल…

250
2
Google search engine
Google search engine
Google search engine

नगराध्यक्षांबरोबर आर्थिक व्यवहार न झाल्याचा ठेकेदाराचा ई-मेल : आरोप सिद्ध झाल्यास क्षणभरही पदावर राहणार नाही…

मालवण, ता. २७ :

विरोधकांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून सादर केलेली व्हिडीओ व ऑडीओ क्लिपमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून बदल केला आहे. नगरपरिषदेतील बांधकाम, लेखाविभागात आमच्याच कालावधीत सीसीटीव्ही बसविले आहेत. त्यामुळे तेथे आर्थिक व्यवहार झाला हे म्हणणे चुकीचे आहे. विरोधकांचे उत्पन्नाचे सर्व मार्ग बंद झाल्यानेच ते वैफल्यग्रस्त बनून माझ्यावर आरोप करत आहेत. जनतेने ज्या विश्‍वासाने आपल्याला निवडून दिले त्या विश्‍वासाला तडा जाऊ देणार नाही. ज्यादिवशी माझ्याविरोधात भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध होईल त्यादिवशी एक क्षणही त्या पदावर राहणार नाही असे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
रॉयल इक्विपमेंट कंपनीचे राकेश साहल यांच्याकडून याच नगरसेवकांनी जबरदस्ती करत तक्रार लिहून घेतली आणि तथाकथित स्टिंग ऑपरेशन घडवून आणले. त्यामुळे साहल यांनीच आपण कोणताही आर्थिक व्यवहार केलेला नाही. याबाबत नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांच्या विरोधात आपली कोणतीही तक्रार नसल्याचा ई-मेलही पाठविला असल्याचे श्री. कांदळगावकर यांनी सांगितले.
नगराध्यक्ष कांदळगावकर यांनी पत्रकार परिषद घेत विरोधकांनी केलेल्या आरोपांवर आपली भूमिका मांडली. आपण पालिकेतून स्वेच्छानिवृत्ती ही असल्याच राजकारणाला कंटाळून घेतली होती. मात्र पालिकेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत येथील जनतेने आपल्याला निवडून दिले. गेले तीन वर्षे प्रामाणिकपणे काम करत आहे. आतापर्यत कोट्यवधी रुपयांच्या धनादेशावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत असे असतानाच आत्ताच नगराध्यक्षांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला जात आहे. याची सुरवात विधानसभा निवडणुकीपासून झाली. सुदेश आचरेकरांचे खंदे समर्थक नरेश हुले यांचा मी शिवसेनेत प्रवेश घेतल्याचे शल्य त्यांना बोचत आहे. त्यानंतर स्वाभीमान तालुकाध्यक्ष मंदार केणी, यतीन खोत, शीला गिरकर, भाई कासवकर हे त्यांच्या गटातील माणसे शिवसेनेत दाखल झाले. याचा एकत्रित परिणाम विधानसभेत तेराशेचे मताधिक्य शिवसेनेला मिळाले. शिवसेनेचे शहरातील प्राबल्य वाढत असल्याने त्यांना आपला भविष्यात पराभव दिसू लागला. त्यामुळेच ते आरोप करत आहेत. विरोधकांनी केलेल्या तक्रारीची चौकशी होईल त्यानंतर त्यातील सत्य सांगू.
बांधकाम, लेखाविभागात सीसीटीव्ही आहेत त्यामुळे संबंधित ठेकेदाराने तेथे आर्थिक गैरव्यवहार केला असता तर तेथून तो तडक निघून गेला असता अधिकारी, कर्मचार्‍यांना हात मिळवित गेला नसता. त्यामुळे ती ऑडीओ व व्हिडीओ क्लिप यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे. आचरेकर हे बरीच वर्षे पालिकेत आहेत. त्यांची रोजीरोटी पालिकेवरच सुरू आहे. त्यांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्यांनी आपले व्यवसाय जाहीर करावेत. कुठून उत्पन्न मिळते जाहीर करावे. मुंबईसारख्या ठिकाणी कोट्यवधी रुपयांचे फ्लॅट कसे याचे उत्तर जनतेला द्यावे. उत्पन्नाची साधने बंद झाल्याने वैफल्यग्रस्त होऊन खोटे आरोप करत आहेत. नगरपरिषदेत कमी दराच्या निविदा येत असल्याचे शल्य जे नेहमी कॅल्क्युलेटर घेऊन बसतात त्या विरोधकांना आहे. ज्या ठेकेदाराने तक्रार दिली त्याची निविदा नामंजूर करण्यासाठी हेच प्रयत्न करत होते. मात्र कमी दराची निविदा आम्ही मंजूर करत पालिकेचा आठ लाख रुपयांचा फायदा केला. जर आम्हाला गैरव्यवहार करायचा असता तर कमी दराच्या निविदा मंजूर केल्या नसत्या. सर्वबाजूंनी त्यांचे उत्पन्न घटत चालले आहे. बिल्डर लॉबीलाही ते त्रास देत असून त्यांच्याविरोधात जिल्हाधिकार्‍यांकडे त्यांनी तक्रार दिली आहे. आचरेकर हे निवडून आल्यापासूनच राजीनाम्याची मागणी करत आहेत. यात आता त्यांच्यासोबत गणेश कुशेंची भर पडली आहे. त्यामुळे या दोघांनी नगराध्यक्षाची निवडणूक नक्की कोण लढविणार हे ठरवावे असा टोला त्यांनी लगावला.

\