भाऊ सामंत यांच्या नावाला जास्त पसंती ; केनवडेकर, तोडणकर, लुडबे, तोरसकर, चिंदरकर यांचीही नावे चर्चेत…
मालवण, ता. १ : भाजपचा नवा तालुकाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचीच चर्चा सध्या तालुक्यात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर तालुकाध्यक्ष पदासाठी अनेकांनी जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे दिसून येत आहे. यात भाऊ सामंत, आप्पा लुडबे, विद्यमान तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर, धोंडी चिंदरकर, रविकिरण तोरसकर, अशोक तोडणकर यांची नावे चर्चेत आहेत. यात भाऊ सामंत यांच्या नावाला जास्त पसंती असल्याचे कार्यकर्त्यांमधून बोलले जात आहे. त्यामुळे भाजपचे तालुकाध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागते याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.
भाजप तालुकाध्यक्ष पदाच्या निवड प्रक्रियेला सध्या भाजपमध्ये वेग आला असल्याचे चित्र आहे. येत्या ५ तारखेपर्यंत जिल्ह्यात भाजपच्या तालुकाध्यक्षांची निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. विद्यमान तालुकाध्यक्ष विजय केनवडेकर यांनी दोन वर्षाच्या कार्यकाळात तालुक्यातील अनधिकृत वाळू, सी-वर्ल्ड प्रकल्प यासह अन्य विविध प्रश्नांवर आवाज उठविताना सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. त्यामुळे त्यांचाही तालुकाध्यक्ष पदासाठी पुन्हा विचार होऊ शकतो. आप्पा लुडबे, धोंडी चिंदरकर, रविकिरण तोरसकर हेही आपापल्या भागात भाजप पक्षाचे प्रभावीपणे करताना दिसून आले आहे.
विधानसभा निवडणुकीत स्वाभीमान पक्ष भाजपमध्ये विलीन झाल्यानंतर तालुक्यातील भाजपची ताकद वाढली आहे. यात स्वाभीमानमधून भाजपमध्ये दाखल झालेले आणि सध्या प्रभारी तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहत असलेले माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर यांचे नावही तालुकाध्यक्ष पदाच्या शर्यतीत आहे. एकंदरीत इच्छुकांनी तालुकाध्यक्ष पदासाठी मोर्चेबांधणी केली आहे. भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी काल रात्री येथे येत भाजप पदाधिकाऱ्यांकडून सदस्य संख्येचा आढावा घेतल्याचे समजते. त्यामुळे येत्या काळात भाजपच्या तालुकाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.