घरात घुसून मारहाण केल्याप्रकरणी देवगड येथील बाप-लेकाला सश्रम कारावास…..

2

ओरोस ता ०२ :
दुसऱ्याच्या घरात बेकायदेशीर घुसून एका व्यक्तीला गंभीर दुखापत केल्याप्रकरणी देवगड येथील हैदर रेहमान खान (वय ५०), सुहेल हैदर खान (वय ३२) या बाप-मुलाला देवगड न्यायालयाने सुनावलेली शिक्षा जिल्हा न्यायालयाने कायम ठेवली आहे. एक वर्ष सश्रम कारावास आणि १० हजार रूपये ही शिक्षा असून येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे जिल्हा न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी कायम ठेवली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने जिल्हा सहाय्यक सरकारी अभियोक्ता रूपेश देसाई यांनी काम पाहिले.
आरोपी हैदर खान याने आपल्या मुलिशी प्रेमसंबंध ठेवत असल्याचा राग ठेवून आपला मुलगा सुहेल याला घेत नरेंद्र पवार यांच्या देवगड येथील घरात बेकायदेशीर प्रवेश करीत त्यांना स्टिलच्या रॉडने मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले होते. ०३ ऑक्टोबर २०१० रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती. याबाबत देवगड न्यायालयात जखमी नरेंद्र यांचा भाऊ महेंद्र पवार यांनी फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार या बाप-लेकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याबाबत देवगड न्यायालयात सुनावणी पूर्ण होवून या दोघांनाही दोषी ठरविले होते. ४ एप्रिल २०१५ रोजी देवगड न्यायालयाने भादवि कलम ३२६ नुसार एक वर्ष सश्रम कारावास आणि ५ हजार रूपये दंड ठोठावला होता. ४५२ नुसार १ वर्ष सश्रम कारावास व ५ हजार रूपये दंड केला होता. या दोन्ही शिक्षा एकत्रित करून एक वर्षा सश्रम कारावास व १० हजार रूपये आर्थिक दंड ही शिक्षा केली होती. तसेच १० हजार रूपये दंड न भरल्यास अधिक ३ महीने सश्रम कारावास सुनावण्यात आला होता. देवगड न्यायालयाच्या या निर्णया विरोधात आरोपींनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज केला होता. यावर देवगड न्यायालयाची शिक्षा कायम ठेवत आरोपींचा अर्ज निकाली काढला आहे.

16

4