अतुल रावराणे; नाणार विरोधात शिवसेनेची भूमिका ठाम….
वैभववाडी ता. ०३ :
महाविकास आघाडीचे सरकार हे बळीराजाचे सरकार आहे. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनादेशाचा उपयोग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत. नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात शिवसेनेची भूमिका ठाम होती. आ. नितेश राणे यांनी व्टिट करून नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे श्रेय घेवू नये. त्यांनी नाणारबाबत आपल्या पक्षाची स्पष्ट करावी. असा टोला शिवसेनेचे अतुल रावराणे यांनी लगावला.
वैभववाडी येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तालुका प्रमुख मंगेश लोके, जिल्हा बँक संचालक दिगंबर पाटील, सभापती लक्ष्मण रावराणे, बंडू मुंडले, शहर प्रमुख प्रदीप रावराणे, अशोक रावराणे, संभाजी रावराणे, श्रीराम शिंगरे, सदानंद रावराणे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
यावेळी बोलताना रावराणे म्हणाले, पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले आहेत. आरे मेट्रो आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिल्यानंतर नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी पुढे आली होती. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे गुन्हे मागे घेतले आहेत. मात्र नाणार आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे श्रेय आ. नितेश राणे यांनी घेवू नये. त्यांनी नाणारबाबत आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट करावी असा टोला त्यांनी लगावला.
उध्दवजींनी कोकणावरील आपले प्रेम प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. महाविकास आघाडीचे सरकार हे बळीराजाचे सरकार आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर रायगड किल्ला संवर्धनासाठी निधी दिला. नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले. मुंबईची श्वास नलिका असणारी आरेला स्थगिती दिली. शेतकऱ्यांनासाठी चांगल्या प्रकारे निर्णय घेत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार लोकाभिमुख सरकार आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न तडीस लावण्यासाठी संपूर्ण मंत्रीमंडळ ताकद लावत आहे.
मागच्या सरकारने दडपशाही करून जे निर्णय घेतले त्याला मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. कोकणाला सेनेने झुकते माप दिले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन जिल्हा आहे. गोवा-केरळच्या धर्तीवर पर्यटनाचा विकास करण्यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. काहीजण केवळ वल्गना करतात. असा टोला लगावत वैभववाडी एसटी स्थानकाचे टेंडर झाल्यानंतर प्रक्रिया दाखविण्यात आली. अशा प्रकारचे स्टंट होणार नाही. आमच्याकडून शाश्वत विकास होईल. यासाठी महाविकास आघाडी सरकार कटीबध्द असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचा आमचा प्रयत्न- रावराणे
भविष्यात निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र येवून निवडणुका लढवणार का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता, आमचा प्रयत्न सर्वांना एकत्र घेऊन चालण्याचा आहे. काहींनी आजपर्यंत दडपशाहीत सरकार चालविले. महाराष्ट्र हा नेहमीच अन्यायाविरोधात उभा राहिला आहे. येथे अन्याय सहन केला जाणार नाही. ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे.