वेंगुर्ला- पेंडुर येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा संपन्न…
वेंगुर्ले : ता.३
गावाने एक संकल्प करणे व मुंबई मंडळासाहित प्रत्येक व्यक्तीने एकत्र येऊन दिवस रात्र मेहनत करून तो संकल्प पूर्ण करणे हे फार मोठे उदाहरण पेंडूर ग्रामविकास मुंबई मंडळाने व येथील ग्रामस्थांनी पुढच्या पिढीसमोर ठेवले आहे. इच्छाशक्ती काय असते हे या मंडळाने दाखवले असून यापुढेही सर्वांनी एकत्र येऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी वेंगुर्ला- पेंडुर येथे रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यात केले.
श्री देव घोडेमुख शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा संस्था पेंडूर आणि पेंडूर ग्रामविकास मंडळ मुंबई, पुणे यांच्या वतीने रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा व गुणगौरव सत्कार समारंभ संपन्न झाला. यावेळी सर्वप्रथम आमदार नितेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तर जेष्ठ नेते एम. के. गावडे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यानंतर आमदार राणे यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष संजू परब, सावंतवाडी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, जि. प. सदस्य दादा कुबल, माजी सरपंच संतोष गावडे, मनीष दळवी, तुळस सरपंच शंकर घारे, सोमेश्वर सोसायटी आडेलीचे चेअरमन समीर कुडाळकर, मातोंड सोसायटी संचालक ज्ञानेश्वर केळजी, ज्ञानेश्वर परब यांच्यासहित इतर मान्यवर उपस्थित होते. पेंडुर गावचे माजी सरपंच संतोष गावडे यांनी आमदार नितेश राणे व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. तसेच या कार्यक्रमात गावातील जेष्ठ नागरिक, माजी सैनिक यांचा सत्कार आमदार राणे यांच्या हस्ते करण्यात आला तर विद्यार्थ्यांचा गुणगौरव उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार काका सावंत यांनी मानले.