लाच घेणे आले अंगलट;मुख्य कार्यकारी अधिकारी मंजूलक्ष्मी यांनी दिले आदेश….
ओरोस, ता ०५ :
दिव्यांग व्यक्तिकडून अडिज हजार रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी पोलिस कोठडीत असलेले जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्या वरिष्ठ सहाय्यक विद्याधर पवार यांना गुरुवारी मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी निलंबित केले आहे.
जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाचे वरिष्ठ सहाय्यक विद्याधर राजाराम पवार (वय 52) यांना अडिज हजार रुपयांची लाच घेताना जिल्हा लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी जिल्हा परिषद आवारात दुपारी दीड वाजता रंगेहाथ पकडले होते. एका दिव्यांग व्यक्तिकडून रोख लाच घेताना ही कारवाई करण्यात आली होती. दरम्यान, बुधवारी त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता 6 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
शासनाच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने दिव्यांग व्यक्तींसाठी अनेक योजना कार्यान्वीत आहेत. यातील दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी बनता यावे. स्वरोजगारातून स्वतःच्या पायावर आर्थिक दृष्टया उभे राहता यावे, यासाठी आर्थिक मदत करणारी योजना जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्यावतीने राबविली जाते. याच योजनेचा लाभ मिळावा यासाठी एका दिव्यांग व्यक्तीने स्वयंरोजगारसाठी 25 हजार रुपयांचे बीज भांडवल मिळावे, यासाठी अर्ज समाज कल्याण विभागाकडे केला होता. मात्र, हे प्रकरण मंजूर करण्यासाठी विद्याधर पवार यांनी अडिज हजार रुपयांची लाच मागितली होती. एवढी रक्कम देणे शक्य नसल्याने सबंधित दिव्यांग व्यक्ती अडचणीत आली होती. त्यामुळे त्यांनी याची तक्रार 2 डिसेंबर रोजी कुडाळ येथील लाचलुचपत विभागाकडे केली होती.
लाचलुचपत विभागाने याचे गांभीर्य ओळखत तात्काळ कारवाईचे नियोजन केले. त्यानुसार सापळा रचत मंगळवारी दुपारी दीड वाजता जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर असलेल्या टपाल मध्यवर्ती कार्यालयाकडे ही रक्कम वरिष्ठ सहाय्यक पवार हे स्वीकारत असताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. याबाबत सिंधुदुर्गनगरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी पवार यांना येथील जिल्हा विशेष न्यायालयात हजर केले असता 6 डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी विद्याधर पवार यांच्यावर कोणती कारवाई करतात ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर मंजूलक्ष्मी यांनी गुरुवारी पवार यांच्यावर निलंबनची कारवाई केली आहे.