बांदा सरपंच निवडणुकीसाठी सव्वा पाच हजार मतदार करणार मतदान…..

138
2
Google search engine
Google search engine
Google search engine

उद्या मतदान ;अक्रम खान आणी मकरंद तोरसकर यांच्यात होणार लढत…..

बांदा, ता.०७:
शिवसेना व भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या बांदा सरपंच पोटनिवडणुकीसाठी उद्या रविवारी मतदान होणार आहे. शहरातील एकूण ७ मतदान केंद्रावर ५ हजार ३२० मतदार मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी गणपत लोंढे यांनी दिली. भाजपचे अक्रम खान व शिवसेनेचे मकरंद तोरस्कर यांच्यात थेट लढत होणार आहे. साईप्रसाद कल्याणकर हे अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. सोमवार दिनांक ९ रोजी सकाळी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात मतमोजणी होणार आहे.
शहरात एकूण पाच प्रभागात ७ मतदान केंद्रे आहेत. शहरात २ हजार ६९० पुरुष तर २ हजार ६३० महिला मतदार आहेत. मतदानादिवशी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी महसूल बरोबरच पोलीस प्रशासन देखील सज्ज झाले आहे. शहरात बंदोबस्तासाठी ओरोस पोलीस मुख्यालयातून १५ अतिरिक्त पोलीस कर्मचारी दाखल झाले आहेत.
गेल्या आठ दिवसात दोन्ही पक्षांकडून प्रचाराचा धुरळा उडविण्यात आला. दोन्ही पक्षांनी ही पोटनिवडणुक प्रतिष्ठेची केल्याने संपूर्ण जिल्हावासीयांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. भाजपकडून अक्रम खान यांच्या प्रचारासाठी माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी आमदार राजन तेली, जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार तर शिवसेनेकडून मकरंद तोरस्कर यांच्या प्रचारासाठी माजी पालकमंत्री दीपक केसरकर, युवा नेते संदेश पारकर, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णा केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते हे मैदानात उतरले होते.
प्रचारसभा व घरोघरी करण्यात आलेल्या प्रचारामुळे शहरातील वातावरण ढवळून निघाले. दोन्ही पक्षांनी आपलाच विजय होणार असल्याचा दावा केला आहे. सोमवारी सकाळी १० वाजता तहसीलदार राजाराम म्हात्रे यांच्या उपस्थितीत मतमोजणीस प्रारंभ होणार आहे. एकूण सात फेऱ्या होणार आहेत. अर्ध्या तासात निकाल स्पष्ट होणार आहे.

\