नारायण राणेंचा इशारा; महाविकास आघाडी सरकारसह नेत्यांवर जोरदार टीका
कणकवली.ता,०८: उद्धव ठाकरे सरकार कडून स्थगिती देण्यात आलेले कोकणातील
पर्यटन व विकास प्रकल्प पुन्हा मार्गी लागण्यासाठी प्रसंगी आंदोलन करू त्यासाठी येत्या आठवडाभरात जिल्हा ढवळून काढू असा इशारा भाजपाचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिला.दरम्यान सत्तेत सहभागी नसताना खासदार विनायक राऊत हे चुकीच्या पद्धतीने बैठका आयोजित करून अधिकाऱ्यांना वेठीस धरत आहेत. त्यांनी विमान लवकर उडेल हा केलेला दावा हा खोटा आहे असेही त्यांनी सांगितले .
श्री राणे आज कणकवली येथे पत्रकार परिषद घेतली.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी आमदार नितेश राणे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार अशोक सावंत,सुधीर आडीवरेकर,दीलीप भालेकर,शैलेश तावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते .
यावेळी राणे यांनी महा विकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली केवळ आपल्या फायद्यासाठी शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र आले आहेत मात्र त्यांचे सरकार अनेक दिवस शिकणार नाही त्यांचे पटणार नाही त्यामुळे त्याचा फटका राज्याच्या विकासावर होणार आहे याठिकाणी सत्ता स्थापनेचा दावा केलेल्या महा विकास आघाडी सरकारने केवळ सर्व प्रकल्पांना स्थगिती देण्याचे काम केले आहे त्यामुळे हे सरकार पाहुणे ठरणार आहे असेही राणे म्हणाले.