सूर्यकांत नाईक यांचा आरोप; तहसीलदारांकडे केली कारवाईची मागणी…
सिंधुदुर्गनगरी ता १२ :
सावंतवाडी तालुक्यातील तळवणे गावात इको सेन्सिटिव्ह झोन असतानाही या गावात मायनिंग शेजारी १५ ते २० जांभ्या दगडाच्या (चीरे) खानी सुरु असून या ठिकाणी बेकायदा चीरे उत्खनन होत आहे. संबधित लोक बेकायदा उत्खनन करून शासनाची करोडो रुपयांची रॉयल्टी बुडवत आहेत. त्यामुळे बेकायदा उत्खनन करणाऱ्यांवर कायदेशीर कार्रवाई करण्यात यावी अशी मागणी आरोंदा येथील सूर्यकांत नाईक यांनी सावंतवाडी तहसीलदारांकडे केली आहे.
सावंतवाडी तालुक्यातील तळवणे मायनिंग शेजारी १५ ते २० जांभ्या दगडाचे बेकायदेशीर उत्खनन राजरोस सुरु आहे. हे उत्खनन इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या भागात सुरु आहे. या कडे तलाठी मंडळ अधिकारी आणि महसुल अधिकारी सोईस्कररित्या डोळेझाक करीत असल्याचा आरोपही नाईक यांनी केली आहे. तसेच बेकायदा उत्खनन करून शासनाचा करोड़ो रुपयांचा महसुल बूड़त आहे. याकडे आपण गेली दोन वर्षे प्रशासनाचे लक्ष वेधत आहोत. मात्र प्रशासन कोणतीही कार्यवाही करत नसल्याचा आरोपही सूर्यकांत नाईक यांनी केला आहे.
बेकायदा उतखननाकडे नाईक यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले असून बेकायदा उतखननबाबत मोजणी करावी, वाहने जप्त करावी आणि खान चालक मालक यांच्यावर कायदेशीर करवाई करावी आणि रॉयल्टी व दंड वसूल करावा अशी मागणी केली आहे.