आचरे गाव झाले सुनेसुने….

220
2
Google search engine
Google search engine
Google search engine

आजपासून गावपळण; रविवारी गाव भरण्याचा कौल…

आचरा ता.१२ :

आज दुपारी श्रीदेव रामेश्‍वर संस्थानमध्ये तोफेचा आवाज झाला आणि आचरा गाव फुटला. तोफेच्या आवाजानंतर काही वेळात संपूर्ण आचरे गाव गुराढोरांसह वेशीबाहेर गेले आणि गावपळणीला सुरवात झाली. रविवारी (ता.15) गाव भरण्याचा कौल होणार आहे. त्यानंतर आचरे गावातील वर्दळ पुन्हा सुरू होणार आहे.
चार वर्षानंतर आजपासून आचरे गावची ऐतिहासीक गावळण सुरू झाली. यात गावाबाहेर जाण्यासाठी काही नागरिकांनी होडीचा तर काहींनी गाड्यांमध्ये सामान घेऊन आचरा वेशाच्या बाहेर मुक्काम ठोकला. आता आचरा गावात निरव शांतता आहे. आचरे गावचे ग्रामदैवत रामेश्वरावर सर्व घरादाराची जबाबदारी सोपवत ग्रामस्थांनी वेशीबाहेर आपले संसार थाटले आहेत. पुढील तीन दिवस तीन रात्री केवळ गजबजाट असणार आहे तो वेशीबाहेर राहुट्यांमध्ये.
सुमारे आठ हजारांच्या वर वस्ती असणारे बारा वाड्या आणि आठ महसुली गाव असलेले आचरा गाव गुरुवारी दुपारनंतर सुरू झालेल्या गावपळणीसाठी गावाच्या वेशीबाहेर विसावले आहे. आचरे गावातील बारा वाड्यापैकी ज्या बाजूची वेस जवळची आहे त्याबाजूला नागरिकांनी वेशीबाहेर वस्ती केली आहे. यात पारवाडीखाडी किनारी भगवंत गड रस्त्यालगत राहुट्या उभारून ग्रामस्थांनी आपले वस्ती स्थाने बनवली आहेत. केवळ राहण्यासाठी आधार एवढ्याच उद्देशाने राहुट्या उभारल्या गेल्या नसुन काहींनी आपल्या कल्पकतेने या राहुट्यांना आकर्षक साज चढविला आहे. संपूर्ण गाव निर्मनुष्य झाला तरी श्री देव रामेश्वराची दैनंदिन पुजा अर्चा सुरू असल्याने या साठी संबंधित गुरव,ब्राम्हण मंदिरात येवून पुन्हा आपल्या निवासस्थानी वेशीबाहेर जातात .दुपारी आणि सायंकाळी मंदिरालगत वाजविला जाणारा चौघडा मंदिराच्या आवारात वाजविला जातो.या साठी आवश्यक तेवढेच ग्रामस्थ गावात येऊन पुन्हा वेशीबाहेर जातात मात्र इतर कोणी तीन दिवस गावात येत नसल्याचे ग्रामस्थांकडून सांगितले गेले.

\