दाभोली न्यू इंग्लिश स्कूलच्या संगणक कक्षाला आग…

2

आज दुपारची घटना;सुमारे ३ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान…

वेंगुर्ले.ता,१४:  दाभोली येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या संगणक कक्षाला आग लागण्याचे प्रकार आज दुपारी घडला.या आगीत सुमारे ३ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी,असा प्राथमिक अंदाज आहे.दरम्यान याबाबतची नोंद वेंगुर्ला पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की
आज शनिवारी सकाळची शाळा होती. या दिवशी ‘स्पोर्ट डे‘ साजरा करून ११.३० वाजता शाळा सुटली. त्यामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक आपापल्या घरी गेले होते. सुमारे १२.३० ते १२.४५ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीची कल्पना स्थानिक ग्रामस्थांना धुरामुळे समजली. स्थानिक ग्रामस्थ अण्णा दाभोलकर यांनी वेंगुर्ला नगराध्यक्षांना फोन करुन आग विझविण्यासाठी बंब पाठविण्यास सांगितले. तर पोलिस पाटील जनार्दन दाभोलकर यांनी वेंगुर्ला पोलिस स्टेशनला या आगीच्या घटनेची माहिती दिली. मुख्याध्यापक आत्माराम सोकटे हे बाहेर गावी गेलेले असल्याने त्यांना या घटनेची माहिती नगराध्यक्षांमार्फत मिळताच सोकटे यांनी स्कूलमधील सर्व शिक्षकांना त्वरित शाळेकडे जाऊन उपायायोजना करण्याबाबत सूचना केली. त्यानुसार सर्व शिक्षक व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सरपंच उदय गोवेकर, पोलिस पाटील जनार्दन पेडणेकर, दाभोली तलाठी ठाकूर, शिक्षक व ग्रामस्थ यांनी संगणक कक्षाचा दरवाजा उघडून सदरची आग अर्ध्या तासात विझविली. तरी सुद्धा १२ संगणकांसह त्यांचे साहित्य, लाकडी कपाटे, वीज मिटर, प्रोजेक्टर, जनरेटर यांचे सुमारे ३ लाख ८० हजार रुपयांचे नुकसान झाले. स्कूलमार्फत या घटनेची माहिती वेंगुर्ला पोलिस स्थानकात देण्यात आली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अजित परब करीत आहेत.

6

4