संजू परब; राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्याचा भाजपाकडून निषेध…
सावंतवाडी ता.१५: “मी माफी मागायला सावरकर नाही….गांधी आहे.” या राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यात आज येथील तालुका भाजपाच्या वतीने निषेध करण्यात आला.याबाबत भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजू परब यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी राहुल गांधींवर वर बोलण्या एवढा “मी” मोठा नेता नाही,मात्र एका स्वातंत्र्यवीराचा अपमान करणे गांधी घराण्याला शोभत नाही.आणि मी एक भारताचा सामान्य नागरिक म्हणून त्यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो.या वक्तव्याबद्दल त्यांनी पूर्ण देशाची माफी मागावी,अशी मागणी श्री.परब यांनी यावेळी केली.
श्री.परब पुढे म्हणाले,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी राहुल गांधींनी “मेक इन इंडियाचा प्रवास रेप इंडिया कडे होत आहे,”अशी टीका केली होती.या टीकेबाबत श्री.गांधींनी माफी मागावी,अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली होती.दरम्यान याबाबतची माफी मागायला “मी” सावरकर नाही,असे वक्तव्य श्री.गांधी यांनी केले होते.यानंतर या वक्तव्याचा देशभरात भाजपाकडून निषेध करण्यात आला.दरम्यान सावरकर एक स्वातंत्र्य सैनिक आहेत.त्यांनी स्वातंत्र्यासाठी काळ्यापाण्याची शिक्षा भोगली,ही शिक्षा भोगत असताना त्यांनी तुरुंगात भिंतीवर लिहून ठेवलेल्या कविता आजही अजरामर राहिले आहेत.अशा स्वातंत्र्यवीरावर असे वक्तव्य करणे चुकीचे आहे.असे त्यांनी यावेळी सांगितले.दरम्यान या वक्तव्यानंतर देशातील सर्व नागरिकांची मने दुखावली आहेत.याबाबत त्यांनी सर्वांचीच जाहीर माफी मागावी,अशी मागणी त्यांनी तालुका भाजपाच्या वतीने केली.