गवताच्या गंजीसह आंबा-काजू कलमांना लागलेल्या आगीत एक लाखाचे नुकसान…

159
2
Google search engine
Google search engine
Google search engine

वेंगुर्ले ता.१५:  वेंगुर्ला, कॅम्प-वडखोल-परबवाडी येथील प्रज्ञा पांडुरंग परब यांच्या गवताच्या गंजीला तसेच आंबा काजू कलमांना आग लागून सुमारे एक लाखाचे नुकसान झाले आहे. सदर आगीचे कारण या बागेतुन जाणा-या वीज वाहिन्यांच्या घर्षणाने असल्याने विद्युत वीज वितरण कंपनीकडे या संदर्भात एक महिन्यापूर्वी लेखी तक्रार करूनही वीज वितरणच्या कर्मचा-यांनी या संदर्भात दुर्लक्ष केल्याने ही घटना घडली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी विद्युत वीज वितरण कंपनीच्या विरोधात तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

वेंगुर्ला, वडखोल-परबवाडी येथे आज दुपारी साडेबारा वाजणाच्या दरम्यान शॉर्टसर्किट होऊन येथील प्रज्ञा परब यांच्या आंबा काजू बागेला आग लागली. ही आग पुढे पुढे गेल्यावर तेथील असणा-या गवताच्या गंजीला लागली. या आगीत सुमारे सहा हजार पेक्षा अधिक गवताच्या पेंढ्या जळून खाक झाल्या. तसेच बाजूला असलेल्या आंबा व काजू कलमे आगीत होरपळून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. सदर घटना समजताच येथील प्रज्ञा परब, गोपीचंद परब, मुकुंद परब, राजाराम राणे, भास्कर परब, बाबाजी परब, मंगेश परब, नारायण परब, प्रदीप परब, किरण परब, सुशांत राणे, गौरव राणे, काशी परब, माधुरी परब, राधिका परब, चंद्रकला परब, दशरथ परब, संतोष परब, चंद्रकांत पडते, गजानन परब, अर्पिता परब, रविना राणे यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. मात्र ही आग गवताच्या गंजी लागल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण झाले. दरम्यान घटनास्थळी वेंगुर्ला नगरपरिषदेचा बंब दाखल झाला. यावेळी बंबावर कार्यरत असलेले सागर चौधरी, लक्ष्मण जाधव, गौरव आरेकर, किरण जाधव, निलेश जाधव, सनातन धमानिया, पंकज पाटणकर यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सदर घटनेची माहिती विद्युत वीज वितरण वेंगुर्ला कार्यालयाचे अधिकारी चव्हाण यांना समजताच त्यांनी घटनेची पाहणी करुन पंचनामा केला व तात्काळ येथील वीज वाहिन्याचे काम हाती घेतले. यावेळी प्रज्ञा परब यांनी मेहनत घेऊन काढलेली गवताची गंजी पूर्णत: जळून खाक झाल्याने व ऐन आंबा काजू हंगामात आंबा काजू कलमे होरपळून गेल्याने त्यांनी हळहळ व्यक्त केली.

\