भुईबावडा विद्यालयातील २००२ च्या दहावी बॕचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन
अगदी पहिलीपासून दहावी पर्यंत एकाच वर्गात व एकमेकांच्या शेजारी बसून शालेय शिक्षण पूर्ण केलेल्या आणि या काळात धमालमस्ती केलेल्या बालमित्रांनी तब्बल १७ वर्षांनी एकमेकांची भेट घेतली. एकमेकांच्या सुख दुःखाबाबत चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरूवात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मुंबई येथील शिरोडकर हायस्कूल परेल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपली मनोगते व्यक्त केली. स्वतःची ओळख करून देताना शाळेतल्या आठवणींना उजाळा दिला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
शिक्षक जयराम पाटील, अरुण मांडके, रामदास लोंढे यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या शाळे विषयीच्या आठवणी, गावच्या माणसाबद्दलची ओढ, भुईबावडा गावाने दिलेले प्रेम तसेच कर्तव्य फाऊंडेशनने केलेली प्रगती या सर्व विषयांचा त्यांनी पाढा वाचला. तसेच रयत सेवक संघाचे अध्यक्ष पाटील यांनी शाळेच्या विकासासाठी झटणा-या कर्तव्य फाऊंडेशनला आपण सर्वांनी साथ द्या. काही मदत लागल्यास आम्ही सोबत असू असे आवाहन त्यांनी केले.
दरम्यान दुपारी सहभोजन झाल्यावर सर्वांनी दादर नारळी बाग येथे पुन्हा एकत्र येत सर्वांचे आभार मानले. या स्नेह संमेलनाला बरेच विद्यार्थी इच्छा असूनही काही कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत.