मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाच्या ठरावाला जिल्हा परिषद बैठकीत “विरोध”

156
2

विरोधकांकडून गोंधळ;आधी सातबारा कोरा करा नंतर अभिनंदनाचा ठराव,केली मागणी

ओरोस ता १६:
राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाच्या ठरावावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. सेनेचे गटनेते नागेंद्र परब यांनी सभागृहात अभिनंदनाचा मुद्दा मांडताच सत्ताधारी गटातील महेंद्र चव्हाण यांनी याला कडाडून विरोध केला. आधी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा मगच अभिनंदनाचा ठराव घ्या, असे सुचवले. याला सत्ताधारी पक्षातील सर्व सदस्यांनी सभागृहात उठून दाद दिली. अभिनंदनाच्या ठरवास विरोध होत असल्याचे लक्षात येताच सेनेच्या प्रदीप नारकर यांच्यासह सर्व सदस्यांनी सभागृहात उभे राहून आक्रमकपणा दाखवत अभिनंदनाचा ठराव घेण्यास भाग पाडले. या विषयासह कृषी व पशु पक्षी प्रदर्शन निमंत्रण, बंधाऱ्यांचा नित्कृष्ट दर्जा याविषयावरुन विरोधक व सत्ताधारी यांच्यात चांगलीच जुंपली. या सभेत राज्यातील राजकीय बदललेल्या स्थित्यंतराचा परिणाम दिसून आला.
जिल्हा परिषद सर्वसाधारण समितीची विशेष सभा सोमवारी अध्यक्ष संजना सावंत यांच्या अध्यक्षतेखाली येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी, उपाध्यक्ष रणजीत देसाई, समिती सचिव तथा सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, विषय समिती सभापती जेरोन फर्नांडिस, अंकुश जाधव, पल्लवी राऊळ, सदस्य प्रदीप नारकर, नागेंद्र परब, संतोष साटवीलकर, अमरसेन सावंत, दादा कुबल, रवींद्र जठार, रेश्मा सावंत, सुनील म्हापनकर, संजय पडते उपस्थित होते.

4