जिल्हा परिषदचा उपक्रम;मुलींच्या भविष्यासाठी ही योजना ठरणार फायदेशीर
ओरोस ता १६:
सुकन्या समृद्धि योजने अंतर्गत जिल्ह्यातील ४८५ मुलींच्या नावे पोस्ट खात्यात प्रत्येकी एक हजार रूपये जमा करण्यात आले आहेत. यापुढे त्यांच्या पालकांनी वर्षाला किमान एक हजार रूपये जमा करावेत. जास्तीत जास्त दीड लाख रूपये जमा करता येणार आहे. जिल्हा परिषदेने यापूर्वीही मूली व महिला यांच्यासाठी विविध नाविन्यपूर्ण योजना राबविल्या आहेत. त्याप्रमाणे ही सुद्धा योजना मुलींसाठी भविष्याची काळजी घेणारा आहे, असे प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी बोलताना केले.
सुकन्या समृद्धि योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 485 मुलींच्या नावे पोस्ट खात्यात एक हजार रूपये भरून खाती उघडण्यात आली होती. त्याच्या प्रमाणपत्राचे वितरण महिला व बाल विकास विभागाच्यावतीने सिंधुदुर्गनगरी येथील शरद कृषि भवन येथे जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मंजूलक्ष्मी या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर आरोग्य व शिक्षण सभापती डॉ अनिशा दळवी, महिला व बाल कल्याण सभापती पल्लवी राऊळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, प्रकाश जोंधळे यांच्यासह लाभार्थी मूली, पालक व अन्य उपस्थित होते.
यावेळी स्क्रीनवर ‘बेटी बचाव, बेटी पढाव’, ‘सुकन्या समृद्धि योजना’ ‘लेक वाचवा, लेक शिकवा’ या योजनाअंतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती देण्यात आली. ‘चांगला व वाईट स्पर्श’ या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी करण्यात आलेल्या घडी पुस्तिकेची माहिती यावेळी देण्यात आली. तसेच जिल्ह्यात 2001च्या जनगणनेत एक हजार मुलांमागे मुलींच्या जन्माचे प्रमाण 944 होते. 2011 मध्ये ते 922 एवढे झाले, ही माहिती देत चिंता व्यक्त करण्यात आली. यावेळी आराध्या प्रसाद वालावलकर या मुलीला प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. 1 एप्रिल 2016 नंतर जन्मलेल्या मुलिसाठी ही योजना असल्याचे यावेळी सांगण्यात आले.



