त्या युवकांना स्थानिकांकडून चोप ; प्रकरण सांमजस्याने मिटविले…
मालवण, ता. १६ : मालवण तालुक्यातील हमरस्त्यावरील एका गावातील प्रशालेतील वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात अल्पवयीन मुलींची बाजूच्या गावातील युवकांनी छेड काढल्याचा प्रकार सोमवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला. ही बाब त्या मुलींनी कार्यक्रमास हजर असलेल्या आपल्या आईला सांगितली. याबाबत त्या युवकांना मुलींचा आईने जाब विचारला असता त्या युवकांनी उद्धटपणे उत्तरे देण्यास सुरुवात केली. त्यामुळे तेथे असलेल्या काही स्थानिक ग्रामस्थानी त्या युवकांना चांगलाच चोप दिला. त्यानंतर प्रशालेतील शिक्षकांनी पोलिसांना बोलावून संबंधित युवकांना पोलिसांच्या ताब्यात दिले. या विषयामुळे येथील वातावरण काही काळ तंग झाले होते. पोलिसांनी त्या संबंधित युवकांना समज देऊन हे प्रकरण सामंजस्याने मिटविण्यात आले.