आता फक्त भाजप,जीवनात दुसरा पक्ष बदलणार नाही.

2

नारायण राणे;सावंतवाडीला विकासात पिछाडीवर नेण्याचे काम केसरकरांनी केले…

सावंतवाडी ता.१६: आता जीवनामध्ये दुसरा पक्ष बदलणार नाही.आता फक्त भाजपातचं काम करायचे आहे. मी व माझी दोन्ही मुले या पक्षात काम करू,शिवसेना व काँग्रेस सोडली त्याला वेगळी कारणे होती,असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज येथे आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या मेळाव्यात व्यक्त केले.दरम्यान सावंतवाडी नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेले उमेदवार संजू परब यांना निवडून आणण्यासाठी सर्व आयुधांचा वापर करा,पण त्यांना निवडून आणा,त्यासाठी सर्वजण एकत्र या,भाजपाचा झेंडा खांद्यावर घ्या,तसे केल्यास त्याचे क्रेडिट राणेंना मिळेल,असेही भावनिक आवाहन यावेळी श्री.राणे यांनी केले.
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजू परब यांचा प्रचार करण्यासाठी श्री.राणे आज या ठिकाणी आले होते.यावेळी मातृछाया मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी राणे म्हणाले याठिकाणी माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून हवा तसा विकास झालेला नाही.सावंतवाडीला विकासात पिछाडीवर नेण्याचे काम केसरकरांनी केले.हायवे रेल्वे बाहेरून गेल्यामुळे येथील व्यावसायिकांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.त्यामुळे येणाऱ्या काळात विकास होण्यासाठी येथील नागरिकांनी भाजपाच्या पाठीशी राहावे.
ते पुढे म्हणाले,आता मी भाजपात आहे. त्यामुळे काळजी नको,.यापुढे जीवनात कोणताही पक्ष बदलला नाही.मी आणि माझे दोन्ही पुत्र भाजपात राहणार आहोत.येणाऱ्या काळात निश्चितच भाजपाला चांगले दिवस येतील.त्यासाठी येथील मतदारांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.आता नगराध्यक्षपदाची निवडणूक आहे. त्यामुळे आपल्या गाडीवर भाजपाचे झेंडे लावा,त्याचे क्रेडिट नक्कीच राणेंना मिळेल असा विश्वास सुद्धा श्री.राणे यांनी व्यक्त केला.

4