पवारांसमोर लोटांगण घालून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले…

2

नारायण राणेंची टीका; वेंगुर्ल्यात भाजपा वाढीसाठी प्रयत्न करणार…

वेंगुर्ले ता.१७: निवडणुकीपूर्वी “मी” शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवणार,असे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते.मात्र रातोरात स्वतःच्या स्वार्थासाठी शिवसैनिकांची फसवणूक करून त्यांनी मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर लोटांगण घातले,अशी टीका माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी आज येथे केली.येथील साई मंगल कार्यालयात आयोजित भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार,प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार राजन तेली,संदीप कुडतरकर,जयदेव कदम,राजू राऊळ,उपसभापती स्मिता दामले,संध्या तेरसे, जी.प.सदस्य समिधा नाईक,दादा कुबल, प्रितेश राऊळ, मनीष दळवी, निलेश सामंत, वसंत तांडेल, गौरवी मडवळ, सुषमा खानोलकर आदी उपस्थित होते.
श्री.राणे पुढे म्हणाले,हिंदुत्ववादी शिवसेना आता धर्मनिरपेक्ष पक्षाच्या कळपात गेली आहे.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर असा शिवसैनिकांवर अन्याय झाला नसता.साहेबांनी मला मुख्यमंत्री केले तेव्हा उध्दव ठाकरे पण होते.परंतु त्यांनी आपल्या मुलाला मुख्यमंत्री नाही केले.हा त्यांच्यातील फरक आहे.म्हणूनच आता बघा,कसे शिवसैनिक दुसरीकडे पळतील असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.मात्र हे भाजपमध्ये कधीच होणार नाही.या पक्षात सर्व पदे ठरवायची एक पद्धत आहे.हा जनतेचा पक्ष आहे.याला टिकवणे आणि वाढवणे ही आपली जबाबदारी आहे.हे आपण सर्वजण नक्की करू हा विश्वास आहे.या सभेनंतर भाजपाची या तालुक्यात सभासद नोंदणी दुप्पट नाही तर तिप्पट होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले की,या तालुक्यात भाजपाला मतदान का होत नाही का उमेदवार निवडून येत नाही याची खंत आहे. येथील जनतेने कोणाला निवडून दिले तर दीपक केसरकर यांना. पण यांनी काय सुविधा दिल्या?,पर्यटनाच्या माध्यमातून काय विकास केला?, कोणते उद्योगधंदे आणले?हा प्रश्न आहे. केसरकर यांची यासाठी क्षमता नाही. सावंतवाडीत पिण्याच्या पाण्याची भयावह परिस्थिती आहे. ज्यांनी सावंतवाडीत काही केले नाही ते वेंगुर्ला, दोडामार्ग मध्ये काय करणार? यासाठी आता भाजप पक्ष मजबूत करून लोकांसमोर जाऊया. महाराष्ट्राच्या विधानसभेत आपला आमदार जावा, भाजपाचा पालकमंत्री व्हावा यासाठी यापुढे प्रयत्न करा. उध्दव ठाकरे मुख्यमं त्री व्हायच्या आधी सातबारा कोरा करा, कर्जमाफी करा, अशा घोषणा करत होते. याबद्दल कोणते ज्ञान त्यांना आहे का?. या गोष्टीचा अभ्यास त्यांनी अगोदर करावा. काँग्रेस व राष्ट्रवादी समोर लोटांगण घालून मुख्यमंत्री पद त्यांनी मिळवले. बाळासाहेब ठाकरे असते तर याना मुख्यमंत्री केले नसते. १ महिना झाला तरी मंत्रिमंडळ नाही, खातेवाटप नाही. मग हाऊस मध्ये प्रश्न कोणाला विचारायचा ही परिस्थिती विधानसभेत निर्माण झाली आहे.
मुख्यमंत्री हे फक्त ५६ आमदारांचे आहेत. बाकीचे आमदार कधीही यांना सोडू शकतात. असा ढ मुख्यमंत्री महराष्ट्राच्या इतिहासात झाला नाही. आपला जिल्हा विकासाकडे वाटचाल करत आहे. आपला विकास ठप्प होऊ द्यायचा नाही. जिल्हा अधोगतिकडे जाता नये म्हणून एकजुटीने, निष्ठने व प्रामाणिकपणे काम करा. वेंगुर्ला मध्ये यापुढे आपण मागे राहणार नाही यासाठी काम करा. देशात भाजपाचा झंझावात सुरू आहे. पक्षात तुमची गुणवत्ता बघूनच पदे दिली जातील. आज तुमचा विश्वास घेण्यासाठी आलो होतो, असे ते म्हणाले.
यावेळी श्री.जठार म्हणाले की,अपना बूथ सबसे मजबूत.बूथ सक्षम तर भाजप सक्षम..आणि भाजप सक्षम तर भारत सक्षम..या दिशेने आपल्याला काम करायचे आहे.
चीपी विमानतळ, राष्ट्रीय महामार्ग या बाबत राणे साहेब दिल्लीत संबंधित अधिकाऱ्यांसोबत बोलतील व हे प्रकल्प मार्गी लावतील.नारायण राणे यांना जेव्हा विरोध करत होतो तेव्हा आम्हाला पण चागलं प्रतिसाद राज्यात होता. राणे सोबत असताना आता हरणे नाही तर प्रत्येक निवडणूक जिंकायचे आहे. हा तालुका चागलं काम करत आहे, आदर्श तालुका अध्यक्ष पुरस्कार द्यायचा झाल्यास तो वेंगुर्ले तालुकाध्यक्ष बाळू देसाई यांना देईन. असे त्यांनी सांगितले.
यावेळी श्री.तेली म्हणाले, संघटन पर्व सध्या राज्यात सुरु आहे. त्यामुळे जास्तीत जास्त सभासद व्हा. पुढील प्रत्येक निवडणुकीसाठी हे आवश्यक आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी आत्ताच सदस्य व्हा. आम्ही सगळे जण एक आहोत हे नुकत्याच झालेल्या बांदा व आब्रड येथील निवडणुकीतून दिसून आले आहे. दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत, आणि सावंतवाडी नगराध्यक्ष निवडणूकही आम्ही भाजप चे संजू परब जिंकतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रस्ताविक करताना तालुकाध्यक्ष बाळू देसाई यांनी खासदार नारायण राणे आमच्या पाठीशी असल्यामुळे वेंगुर्ले तालुक्यात आता निधीची कमतरता भासणार नाही याचा आम्हा सर्वांना विश्वास असल्याचे सांगितले. सूत्रसंचलन प्रसन्ना देसाई तर साईप्रसाद नाईक यांनी स्वागत व आभार मानले.

4