नारायण राणे; शिवसेना, कॉग्रेसवर जोरदार हाल्लाबोल
वैभववाडी/पंकज मोरे.ता,१९: महाराष्ट्रात यापूर्वी कर्तृत्ववान मुख्यमंत्री झाले. परंतु बिनखात्याचा मुख्यमंत्री कधी पाहिला नाही. मुख्यमंत्र्यांना बोलता येत नाही, सभागृह पाहिले नाही, प्रशासनाचा अनुभव नाही. मुख्यमंत्री पदासाठी आडमुठे धोरण, कपट कटकारस्थानामुळे युती तोडून हिंदुत्ववादी विचारांची शिवसेना आज सेक्युलर पक्षाच्या बाजूला गेली. मराठ्यांची भलं करणारी शिवसेना नाही. असा जोरदार हल्लाबोल करीत, या सरकारला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी सर्वांनी एकत्र या. असे आवाहन खा. नारायण राणे यांनी केले.
वैभववाडी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मेळावा येथील माधवराव पवार विद्यालयातील सभागृहात पार पडला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली, जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, जयदेव कदम, तालुकाध्यक्ष राजेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, जि. प. सदस्य सुधीर नकाशे, नगराध्यक्ष रोहन रावराणे, भालचंद्र साठे, सज्जन रावराणे, नासीर काझी, जयेंद्र रावराणे, शारदा कांबळे, सीमा नानिवडेकर, स्नेहलता चोरगे, बाळा हरयाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना राणे यांनी शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल चढवला. निवडणुकीपूर्वी सेना भाजपची युती झाली. २०१४ आणि २०१९ या दोन्ही निवडणुका मोदी यांच्या नावाने जिंकल्या. सेनेचे निवडून आलेले आमदार हे मोदींच्याच नाव लौकीकावर निवडून आले. १६१ आमदार युतीचे आले. जनतेला वाटलं युतीची सत्ता येईल. परंतु तस झालं नाही. उध्दव ठाकरे यांनी जनतेचा कौल मान्य केला नाही.
मुख्यमंत्री पदासाठी आडमुठे धोरण, कपट कटकारस्थानाने युती तोडून कॉग्रेस राष्ट्रवादी सोबत जावून मुख्यमंत्री झाले. एक महिन्यात मंत्री मंडळ देता आले नाही, महाराष्ट्राचे प्रश्न मांडले जात नाहीत. मुख्यमंत्र्यांना बोलता येत नाही. कधी सभागृह पाहिले नाही. प्रशासनाचा अनुभव नाही. विकासकामे करायची माहिती नाहीत. बाळासाहेब ठाकरे असते तर मुख्यमंत्री केलेच नसते. शिवसेनेचा जन्म न्यायहक्क व हिंदुत्ववादासाठी झाला. मात्र हिंदुत्ववादी विचारांची सेना आज सेक्युलर पक्षाच्या बाजूला गेली.
हे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात असू नये. हे लुटारु सरकार असल्याचा जोरदार घणाघात करत सोनिया गांधी फक्त सत्तेसाठी आहेत. यासाठीच युती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेवर गेली २५ वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. मुंबईचा पैसा लुटला आहे. मुंबई भक्कास केली आहे. अशी जोरदार तोफ डागली.
भाजपने पाच वर्षे महाराष्ट्र सांभाळला. कोणताही आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवर होवू शकला नाही. भाजपने न होणारे निर्णय घेतले. तिहेरी तलाक, ३७० कलम व नागरिकत्व विधेयक यासारखे धोरणात्मक निर्णय घेतले. कॉग्रेस राजकारण करीत आहे. सत्तेसाठी आपली पोळी भाजत आहे. अशी टीका करीत सावरकरांवर टीका करण्याचा अधिकार राहूल गांधीना नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्याच्या विकासाला खिळ बसविण्याचे काम हे सरकार करीत आहे. सरकार विरोधात लढावे लागेल यासाठी तुमच्या सहका-यांची गरज आहे. या सरकारला हैराण केल्याशिवाय राहणार नाही. असा जोरदार हल्लाबोल करीत, सरकारला सत्तेपासून खाली खेचण्यासाठी एकत्र या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.