दंडात्मक कारवाई, ट्रॉलरवरील सर्व साहित्य जप्त ; शासन निर्णयानुसार राज्यात प्रथमच कारवाई…
मालवण, ता. १९ : मालवणच्या समुद्रात एलईडीद्वारे अनधिकृतरीत्या मासेमारी करताना मत्स्य व्यवसाय विभागाच्या पथकाने पकडलेल्या गोव्यातील दोन्ही ट्रॉलर्स जप्त करण्याचे आदेश तहसीलदार अजय पाटणे यांनी आज दिले. यात साओ पाउलो या ट्रॉलरचे मालक फ्रान्सिस्को सिल्वेरा यांना ३ लाख ८ हजार ५०० रुपये तर सी एंजेल या ट्रॉलरचे मालक अल्बर्ट डिसिल्वा यांना ५ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. या दोन्ही ट्रॉलर्सचे नोंदणी प्रमाणपत्र व मासेमारी परवाना रद्द करण्याची कार्यवाही संबंधित परवाना अधिकार्यांनी करावी असे तत्काळ कळविण्यात यावे असे आदेशही तहसीलदारांनी दिले. शासन निर्णयानुसार राज्यात प्रथमच ही कारवाई झाली आहे.
काही दिवसांपूर्वी मालवणच्या समुद्रात अनधिकृतरीत्या एलईडीद्वारे मासेमारी करताना गोव्यातील फ्रान्सिस्को सिल्वेरा यांच्या मालकीचा साओ पाउलो व अल्बर्ट डिसिल्वा यांच्या मालकीचा सी एंजेल हे दोन ट्रॉलर्स मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने पकडले होते. यातील सिल्वेरा यांच्या ट्रॉलरवर मोठ्या प्रमाणात मासळी आढळून आली होती तर डिसिल्वा यांच्या ट्रॉलरवर मासे आढळले नाहीत. अनधिकृत मासेमारी करताना हे ट्रॉलर्स पकडल्याने त्यांच्यावर कारवाईसाठी मत्स्यव्यवसाय विभागाच्यावतीने तहसीलदारांकडे प्रस्ताव सादर करण्यात आला. या प्रस्तावानुसार आज तहसीलदार अजय पाटणे यांच्यासमोर दुपारी सुनावणी झाली. यावेळी दोन्ही ट्रॉलर्सचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सायंकाळी या सुनावणीचा निकाल देण्यात आला. यात महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन १९८१ मधील कलम १७ चे पोटकलम (१) अ अन्वये फ्रान्सिस्को रा. तिसवाडी गोवा यांना ३ लाख ८ हजार ५०० रुपयांचा दंड करण्यात आला. संबंधिताने दंडाची रक्कम न भरल्यास ती त्याच्याकडून जमीन महसूलाच्या थकबाकीप्रमाणे वसूल करण्याचा आदेश दिला. या ट्रॉलरवरील सर्व साहित्य जप्त करण्याचे आदेश देण्यात आले. साओ पाउलो नौका क्रमांक आयएनडी जीए-०१ एमएम-३९६ ही नौका सहायक मत्स्यव्यवसाय अधिकार्यांनी जप्त करून ठेवण्यात यावी. त्याचबरोबर या नौकेचे नोंदणी प्रमाणपत्र व मासेमारी परवाना रद्द करण्यासाठी संबंधित परवाना अधिकार्यांना तत्काळ कळवावे असा आदेशही तहसीलदार पाटणे यांनी दिला.
गोव्यातील सी एंजेल या ट्रॉलरचे मालक अल्बर्ट डिसिल्वा यांना पाच हजाराचा दंड ठोठावण्यात आला. त्यांच्या ट्रॉलरवरील सर्व साहित्य जप्त करण्यात यावे. सी एंजेल हा ट्रॉलर जप्त करण्याबरोबरच त्यांचे नोंदणी प्रमाणपत्र, मासेमारी परवाना रद्द करण्यासाठी संबंधित परवाना अधिकार्यांना तत्काळ कळवावे असा आदेश तहसीलदारांनी दिला.
शासनाच्या अध्यादेशानुसार प्रथमच मालवणात एलईडी ट्रॉलर्सवर कारवाई झाली आहे. या कारवाईमुळे परराज्यातील ट्रॉलर्सकडून होणाऱ्या घुसखोरीला आळा बसेल असा विश्वास पारंपरिक मच्छीमारांमधून व्यक्त केला जात आहे.