ओरोस ता १९:
मालवण चिवला बीच येथे रविवारी पार पडलेल्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेमध्ये सिंधुदुर्गनगरी येथील प्रकाश पांडुरंग वराडकर यांनी पुरुषांच्या गटात तिसरा क्रमांक पटकावला तर ओरोस डॉन बोस्को स्कूल मधील दहावीचा विद्यार्थी भाग्येश महेश पालव याने 15 वर्षाखालील गटात दहावा क्रमांक पटकावला आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेमार्फत मालवण चिवला बीच येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धा रविवारी आयोजित करण्यात आल्या होत्या. राज्यभरातून अकराशे पन्नास स्पर्धक विविध गटातून या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. सिंधुदुर्गनगरी येथील आकाशवाणी केंद्रातील वरिष्ठ तंत्र अधिकारी प्रकाश पांडुरंग वराडकर यांनी 42 ते 55 वर्षे पुरुष गटातून तीन किलोमीटर जलतरण स्पर्धेत सहभाग घेतला. 35 मिनिटात हे अंतर पार करत त्यांनी तिसरा क्रमांक पटकावला आहे. वराडकर हे सिंधुदुर्गनगरी येथील जल जलतरण तलावामध्ये सराव करत असून नवोदित जलतरणपटूंना ते प्रशिक्षणही देतात.
डॉन बॉस्को स्कूल मधील दहावीचा विद्यार्थी भाग्येश पालव यानेही तेरा ते पंधरा वर्षे वयोगटात तीन किलोमीटरच्या सागरी जलतरण स्पर्धेत दहावा क्रमांक पटकावला. तोही सिंधुदुर्गनगरी जलतरण तलाव येथे प्रशिक्षण घेत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटनेचे अध्यक्ष दीपक परब, सचिव राजेंद्र पालकर यांनी दोघांचेही अभिनंदन केले असून मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला आहे.