कुणकेरी-इन्सुलि ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा;आत्महत्या नसून खून असल्याचा आरोप
सावंतवाडी ता.२०: कुणकेरी येथील मधुरा मिलिंद परब हिची ती आत्महत्या नसून,निर्गुण हत्या आहे,असा आरोप करत आज कोणकेरी व इन्सुलि ग्रामस्थांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात मोर्चा आणला.दरम्यान या प्रकरणातील मुख्य संशयित असलेल्या तिच्या सासूला तात्काळ अटक करा,अशी मागणी यावेळी पोलिस निरीक्षक सुनील धनावडे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.यावेळी तिला तात्काळ अटक न झाल्यास सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोर दोन्ही गावातील ग्रामस्थ मिळून उपोषण छेडू,असा इशारा त्यांनी दिला आहे.दरम्यान माजी आमदार राजन तेली यांनी सुद्धा उपस्थित राहून या मोर्चाला पाठिंबा दर्शवला.
१५ डिसेंबर रोजी मधुरा परब हिने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती.मात्र ती आत्महत्या नसून तिच्या पती,दीर,सासरा व सासू यांनी मिळून केलेली तिची निर्गुण हत्या आहे,असा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला होता.तर या प्रकरणातील संशयितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती.यानंतर पती,दीर व सासर्याला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली होती.दरम्यान या प्रकरणातील सूत्रधार व मुख्य संशयित असलेल्या तिच्या सासूला तात्काळ अटक करा,या मागणीसाठी आज सावंतवाडी पोलीस ठाण्यात इन्सुली व कुणकेरी ग्रामस्थांनी मोर्चा आणला.दरम्यान ही कारवाई तात्काळ न झाल्यास दोन्ही गावातील ग्रामस्थ सावंतवाडी पोलीस ठाण्यासमोर आमरण उपोषण छेडतील,असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला आहे.
यावेळी मुलीचे वडील नवसोजी गावडे,जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर,चंद्रकांत सावंत ,विकी केरकर,प्रमोद सावंत, मानसी धुरी,महेश धुरी,कृष्णा सावंत,सचिन पालव,मनोहर गावकर, पूजा पेडणेकर, नाना पेडणेकर आदींसह कुणकेरी व इन्सुली ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.