विविध मागण्यांसाठी शिक्षक संघाचे उद्या सिंधुदुर्गनगरीत आंदोलन…

2

ओरोस ता २०: 
जुन्या पेन्शन शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शनिवारी 21 डिसेंबर रोजी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने पुकारलेल्या राज्यव्यापी धरणे आंदोलनात सिंधुदुर्ग जिल्हा शाखा सक्रिय सहभागी होणार असल्याची माहिती राज्य संयुक्त चिटणीस महादेव देसाई यांनी दिली. याच दिवशी जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्गनगरी येथे धरणे आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ ही अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाची संलग्न संघटना आहे. अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या 22 सप्टेंबर रोजी लखनऊ येथे झालेल्या बैठकीत 20 डिसेंबरपर्यंत या प्रश्नाची सोडवणूक न झाल्यास प्रत्येक जिल्हा मुख्यालय येथे धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार अनेक वेळा निवेदन देऊनही प्रश्न जैसे थे स्थितीत असल्याने हे आंदोलन होणार आहे.
2005 नंतरच्या सर्व शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करण्यात यावी. सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करण्यात याव्यात. शिक्षण सेवक पद्धत बंद करून नियमित शिक्षक नियुक्त करावेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील शिक्षक विरोधी तरतुदी रद्द कराव्यात. बदली धोरणात सुधारणा करावी. यासह विविध मागण्यांकडे लक्ष देण्यात येणार आहे. या आंदोलनानंतर 19 जानेवारी 2020 पर्यंत प्रश्नांची सोडवणूक न झाल्यास 20 जानेवारी रोजी आझाद मैदान मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचेही महादेव देसाई यांनी सांगितले.

4