कोमसापच्या सिंधुदुर्ग संमेलन अध्यक्षपदी जिल्हाधिकारी डॉ दीलीप पांढरपट्टे

2

ओरोस ता २०
सिंधुदुर्ग जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या 5 जानेवारी 2020 रोजी इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय दोडामार्ग येथे होत असलेल्या संमेलनच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध गझलकार, साहित्यिक तथा सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी डॉ दिलीप पांढरपट्टे यांची निवड झाली आहे. या संमेलनाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहावे, याचे निमंत्रण शुक्रवारी डॉ पांढरपट्टे यांना कोमसापच्या सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने देण्यात आले.
दोडामार्ग तालुक्यातील दोडामार्ग इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय येथे 5 जानेवारी रोजी सकाळी 9 ते सायं. 5 या वेळेत कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग शाखेचे संमेलन होत आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष निवडीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ पांढरपट्टे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्याचे निमंत्रण डॉ पांढरपट्टे यांना शुक्रवारी देण्यात आले.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा शाखेचे अध्यक्ष मंगेश मसके, जिल्हा सचिव भरत गावडे, जेष्ठ साहित्यिक वृंदा कांबळी, दोडामार्ग शाखा अध्यक्ष प्रभाकर धुरी, प्रकाश तेंडोलकर, विठ्ठल कदम, सुभाष गोवेकर, मंदार मसके, यशवंत गावडे, यशवंत रणशूर आदी उपस्थित होते.

4