समाजकंटकांवर कारवाई करा ; तहसीलदारांना निवेदन सादर…
मालवण, ता. २० : केंद्र सरकारने पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान यांसह अन्य देशातून भारतात आलेल्या हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारसी धर्मीय शरणार्थी भारताचे नागरिकत्व देणारे नागरिकत्व सुधारणा विधेयक संमत केले. सरकारने लोकशाही मार्गाने आणि राज्यघटनेच्या अधिकारात हा निर्णय घेतला असताना नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करून देशाची अखंडता आणि शांतता भंग करणार्या समाजकंटकांवर कारवाई करावी, या मागणीसाठी आज शहरात हिंदूत्वनिष्ठ संघटना, संप्रदाय यांच्यावतीने आंदोलन करण्यात आले. या मागणीचे निवेदन तहसीलदार अजय पाटणे यांना सादर करण्यात आले.
मॅकेनिकल रोडवरील हॉटेल स्वामी परिसरात हे आंदोलन करण्यात आले. यामध्ये नगरसेवक गणेश कुशे, आप्पा लुडबे, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य विलास हडकर, वैदेही जुवाटकर, स्वराज्य महिला ढोलपथकाच्या शिल्पा खोत, नीलम शिंदे, दादा वाघ, राजेश वळंजू, अरविंद ओटवणेकर, अनिकेत फाटक, दीनानाथ गावडे, शिवाजी देसाई, रमाकांत सोन्सुरकर, दैवेश रेडकर, राजेंद्र पाटील यांच्यासह अन्य नागरिक सहभागी झाले होते.
सरकारच्या या निर्णयामुळे विदेशातील अल्पसंख्याक हिंदूवर झालेल्या अत्याचारामुळे निर्वासित होऊन भारतात आलेल्या पीडित हिंदूना न्याय मिळणार आहे. त्यांना भारताचे नागरिकत्व मिळण्यातील अडथळे दूर होणार आहेत. मात्र या निर्णयाविरोधात समाजद्रोही आंदोलकांकडून करण्यात येणारे हिंसक आंदोलन आणि त्यातून होत असलेली हानी ही निषेधार्थ आहे. याचा निषेध करून नागरित्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आंदोलन करून देशाची अखंडात आणि शांतता भंग करणार्या समाजकंटकांवर कारवाई करावी अशी मागणी आंदोलकांकडून करण्यात आली. या मागणीचे निवेदन तहसीलदारांना सादर करण्यात आले.